पनवेल | कराड ते खारघर असा खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करणार्या एका सराफ व्यावसायिकाची तब्बल १ कोटी १४ लाख ३० हजार रुपयांच्या सोन्यासह बॅग चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे खासगी बस प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील भायखळा येथील ‘श्री नाकोडा हाइट्स’मध्ये राहणार्या ६४ वर्षीय सराफाने याबाबत खारघर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ते २० फेब्रुवारी रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथून दुर्गाम्बा ट्रॅव्हल्सच्या (शिमोगा मुंबई) बसने प्रवास करत होते. पहाटे सुमारास खारघर बसथांब्याजवळ पोहोचल्यावर त्यांना आपली बॅग गायब असल्याचे लक्षात आले. बसमध्ये व परिसरात शोध घेतला; मात्र बॅग सापडली नाही.
चोरीस गेलेल्या बॅगमध्ये ६०० ग्रॅम वजनाच्या ८० टक्के शुद्ध सोन्याच्या लगड्या, १४.५०० ग्रॅम व ३३८.८२० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लगड्या तसेच ६० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, बसच्या थांब्यांची व प्रवाशांची माहिती तपासली जात आहे. यापूर्वीही खासगी बसमधील बॅग चोरीच्या घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.