खोपोली । खालापूर तालुक्यातील भोकरपाडा येथील हिरानंदानी फॉर्च्युन सिटी या उच्चभ्रू सोसायटीत एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. 2 नोव्हेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खालापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कर्जाच्या परतफेडीवरुन एका दाम्पत्याने धमकावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मच्छींद्र नारायण पोपटे हे पत्नी मानसी पोपटे (वय 33), रुद्र (वय 11) आणि अनसिका (वय 8) यांच्यासह हिरानंदानी फॉर्च्युन सिटीमध्ये वास्तव्यास होते. मच्छींद्र पोपटे यांनी विश्वनाथ देसाई यांच्याकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती. मात्र, या रकमेची परतफेड होत नसल्याने विश्वनाथ देसाई हे पत्नीसमवेत पोपटे यांच्या घरी गेले होते.
त्यावेळी मच्छींद्र पोपटे घरी नसल्याने देसाई दाम्पत्याने त्यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून मानसी पोपटे यांना धमकावले व शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मानसी पोपटे यांनी आपल्या दोन्ही मुलांसह इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तिघांचे मृतदेह इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच मच्छींद्र पोपटे घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. घटनेची माहिती मिळताच खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल पाटील, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अभिजित भुजबळ आणि खालापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप शिंगटे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, व्याजाच्या पैशांच्या वादातून ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, संशयित विश्वनाथ देसाई आणि त्यांची पत्नी फरार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार महेश बालदी, माजी सदस्य मोतीराम ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलम ारे, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर ठोंबरे आणि सरपंच रितू ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच सखोल चौकशी करण्याची मागणी केली.