नवी मुंबई । बेलापूर येथील न्यायालयापाठोपाठ नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल गुरुवारी (26 नोव्हेंबर) प्राप्त झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय आणि महापालिका मुख्यालय रिकामे करण्यात आले.
बॉम्बशोधक पथकाकडून इमारतीच्या आतील भागांसह संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली.बेलापूर न्यायालयाला धमकीचा ई-मेल मिळताच न्यायालय रिकामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले.
न्यायालयाच्या इमारतीसह परिसरात बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी सुरू आहे. धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे बॉम्बशोधक व नाशक पथक तत्परतेने महापालिका मुख्यालयात दाखल झाले. पथकाने नवी मुंबई पोलीस, महापालिका सुरक्षारक्षक, आपत्कालीन कर्मचारी आणि अभियंत्यांची चार पथके तयार करून बॉम्बशोध मोहीम सुरू केली.
सुमारे तीन तास चाललेल्या या तपासणीत बेसमेंटमधील वाहनतळापासून तळमजला ते सातव्या मजल्यापर्यंतचा परिसर बारकाईने तपासण्यात आला. बॉम्बशोधक पथकासोबत ‘जॅक’ या श्वानानेही शोधकार्यात सहभाग घेतला. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या सहकार्याने महापालिका मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे.
नागरिकांनी मुख्यालयात कामासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन महापालिकेच्या सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केले आहे. दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी महापालिकेचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.