खोपोली । मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ 25 नोव्हेंबर रोजी रात्री एका मिनीबसला अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 15 प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
मुंबईहून 15 प्रवाशांना घेऊन ही मिनीबस मिसिंग लिंक मार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. बोरघाटातील खोपोली बायपासजवळ आल्यानंतर बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक योगेश यांनी प्रसंगावधान राखत तातडीने बस महामार्गाच्या साइडपट्टीवर उभी केली.
त्यानंतर बसमधील सर्व 15 प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. तसेच या घटनेची माहिती तात्काळ बोरघाट पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी कंट्रोलचे फायर रेस्क्यू पथक तसेच खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने काही क्षणांतच रौद्र रुप धारण केल्याने संपूर्ण मिनीबस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान, बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्यासाठी पर्यायी खासगी बसची व्यवस्था करण्यात आली.