महाड, पोलादपूर तालुक्यातील पारमाचीसह तळीये, साखर केवनाळे ; दरडग्रस्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार्‍यांना निर्देश

By Raigad Times    27-Nov-2026
Total Views |
mahad
 
महाड । महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांमधील घरांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक असून, अनेक वर्षांपासून घरांपासून वंचित असलेल्या बाधित कुटुंबांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही युद्धपातळीवर करावी. स्थानिकांच्या गरजांनुसार चांगल्या दर्जाची घरे बांधावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
 
महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त घरांच्या प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “घर हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. दरड कोसळल्यामुळे अनेकांनी घरे आणि कुटुंबातील माणसे गमावली आहेत. पारमाची येथील 198 घरांच्या उभारणीसाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. आवश्यक यंत्रणा घटनास्थळीच उपलब्ध करून बांधकाम सुरू करावे.” घरे बांधताना केवळ फ्लॅट पद्धतीचा विचार न करता स्थानिकांच्या जीवनशैलीला अनुरूप, चांगल्या दर्जाची घरे उभारावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
कपडा आणि मकान उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून शासन काम करीत असून, पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांच्या हिताची कामे करताना कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री भरत गोगावले म्हणाले, दरड कोसळणे, अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे या भागातील अनेक घरे बाधित झाली आहेत. या कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.