पनवेल | पनवेल महानगरपालिका क्षेत्रासह आसपासच्या परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
पालकमंत्री भरत गोगावले यांनी बोलावलेल्या या बैठकीत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यान्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेला सर्वोच्च प्राधान्य देऊन मार्च २०२७ पूर्वी ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी केली.
याची दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असून, लोकसंख्येच्या वाढीसोबतच पाण्याचीमागणीही वाढत आहे. सिडकोच्या वसाहती, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, उलवे आणि इतर विकसित होत असलेल्या भागां ध्ये पाण्याची गरज वाढत आहे. त्यातच पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास उपलब्ध जलस्रोतांवरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूीवर पनवेलच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, पनवेलचे महापौर नितीन पाटील, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक रामदास शेवाळे, प्रथमेश सोण, हरेश केणी, तुषार पाटील, महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह जलसंपदा विभाग, सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
न्हावाशेवा टप्पा-३ योजनेला प्राधान्य देण्याची मागणी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा प्राधान्याने उपस्थित केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारी ही योजना पनवेलच्या भविष्यातील पाणीप्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममधून देखरेख
न्हावाशेवा टप्पा-३ योजनेचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वॉर रूममध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेच्या प्रगतीवर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून लक्ष ठेवले जात आहे. यापूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत या योजनेसंदर्भात दोन वेळा बैठका झाल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीतही योजनेला विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
स्थानिक पातळीवर सहकार्याची ग्वाही
पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणांसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. या दृष्टीने योजनेच्या पूर्ततेसाठी स्थानिक पातळीवर येणार्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत दिली.
मोरबे धरणातून ३० एमएलडी पाण्याची मागणी
दरम्यान, बैठकीत पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनीही पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण मागणी केली. नवी मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणार्या खालापूर तालुक्यातील मोरबे धरणातून पनवेलकरांना किमान ३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.