अलिबाग | तालुक्यातील म्हात्रोळी येथे सुमारे २० आदिवासी-कातकरी कुटुंबांना एका रात्रीत बेघर करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नीच्या नावे खरेदी झालेल्या या जागेवर अनेक वर्षे वास्तव्य असलेल्या आदिवासी कुटुंबांना जबरदस्तीने हटविण्यात आले.
या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासींचे पुनर्वसन करतानाच, या व्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. म्हात्रोळी येथील गट क्रमांक १४८/१ मधील १५ एकर क्षेत्रफळाची जमीन पूर्वी वाकडे नावाच्या व्यक्तीच्या मालकीची होती.
ही जमीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. या जमिनीतील सुमारे २७ गुंठे क्षेत्रावर अनेक वर्षांपासून २० आदिवासी कुटुंबे वास्तव्यास होती. जमीन खरेदी झाल्यानंतर ती विकसित करण्याचे काम करणार्या दशरथ पाटील या एजंटने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या साहाय्याने आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप आहे. घरातील सामानही उद्ध्वस्त करून मातीच्या ढिगार्याखाली गाडण्यात आले.
पाण्यासाठी असलेली बोअरवेलदेखील उखडून टाकण्यात आली. होळीचा सण सुरू असतानाच आमच्या घरांवर जेसीबी चालवण्यात आला, अशी व्यथा या कुटुंबांनी मांडली आहे.
पर्यायी जागाही दुसर्याची...
घरे पाडल्यानंतर आदिवासी कुटुंबांनी आक्रोश केला. त्यानंतर त्यांच्या वाडीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर खोल्या बांधून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र ही जागादेखील दुसर्याच्या मालकीची असल्याचा दावा आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज आणि रस्त्यांसारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कुटुंबांचे हाल होत आहेत.
वस्तीपासून दूर राहावे लागत असल्याने मुलांना शाळेत जाणेही कठीण झाले आहे. काही कुटुंबांना थोडी आर्थिक मदत देण्यात आली, तर काहींना स्वतःची व्यवस्था स्वतः करण्यास सांगण्यात आले. या जमिनीवर आता आमचा ताबा आहे, असे सांगून धमकावण्यात आल्याचा आरोपही विस्थापित कुटुंबांनी केला आहे. सध्या पर्यायी जागेवरील बोअरवेलचे पाणी दूषित असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
महत्वाचे म्हणजे रुम बांधलेली जागाही अन्य मालकाची आहे, त्यांच्याकडून या आदीवासींना हटवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र शासनाने ४ जानेवारी २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, ही कुटुंबे त्यांच्या घराखालील जमिनीची मालक असल्याची नोंद अलिबाग तहसीलदारांच्या सर्वेक्षणाच्या अभिलेखात आहे. या कुटुंबांकडे गेल्या १५ ते २० वर्षांपासून घरपट्टीच्या पावत्याही असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिली आहे.
दरम्यान, आदिवासी कुटुंबांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस आणि महसूल अधिकार्यांनी त्यांची दखल घेतली नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उलट, धमकावून या कुटुंबांकडून जमिनीवर हक्क सांगणार नसल्याचे लेखी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. कागदपत्रांवर काय लिहिले आहे, हे न वाचता त्यांच्याकडून अंगठे घेण्यात आल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी २०२५ मध्ये राज्य मानवी हक्क आयोगाकडे दावा दाखल करण्यात आला होता. मात्र याचिकाकर्ते सुनावणीला उपस्थित न राहिल्याने तो एकतर्फी निकाली काढण्यात आल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. म्हात्रोळीतील आदिवासी कुटुंबांची सध्याची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे नमूद करत, या प्रकरणात दशरथ पाटील आणि कथित कृत्यात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींवर अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. विस्थापित आदिवासी कुटुंबांचे त्यांच्या मूळ जागेवर पुनर्वसन करावे किंवा त्यांना योग्य पर्यायी जागा आणि भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
"संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. शिवसेनेतील फुटीबाबत मी दिलेल्या निर्णयामुळे ते माझ्यावर आरोप करत आहेत. सकाळी नऊ वाजता उठायचे आणि मनात येईल ते बोलून टाकायचे, अशी त्यांना सवय झाली आहे. अलिबाग आणि भांडुपमधील जमीन प्रकरणांबाबतही त्यांनी आरोप केले आहेत. मात्र संबंधित प्रकरणातील कागदपत्रे आणि अहवाल वस्तुस्थिती स्पष्ट करतात. राऊत यांच्याविरोधात येत्या काही तासांत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी असून, त्यांच्या आरोपांना कायदेशीर उत्तर दिले जाईल. -राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष