नाते गावच्या स्मारकाची प्रतीक्षा

By Raigad Times    22-Nov-2026
Total Views |
nate
 
रायगड जिल्ह्याच्या भूमीला लाभलेला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा अत्यंत समृद्ध व अभिमानास्पद आहे. या जिल्ह्याने देशाला आणि समाजाला अनेक थोर मार्गदर्शक, मुत्सद्दी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे दिली आहेत. त्यामध्ये देशाचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कै. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख अर्थात सी. डी. देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
 
त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा एक महत्त्वपूर्ण सोहळा तळा येथे पार पडत आहे. सोमवारी, 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मुलांच्या शाळेतअर्थात ऐतिहासिक ‘दगडी शाळेत’कै. सी. डी. देशमुख यांच्या तैलचित्राचे अनावरण ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते होणार आहे.
 
केवळ एका तैलचित्राचे अनावरण एवढ्यापुरता या कार्यक्रमाची मर्यादा नाही, तर तो रायगडच्या इतिहासाला, ज्ञानपरंपरेला आणि वारसा जतनाच्या भूमिकेला नवी दिशा देणारा क्षण आहे. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणांची भक्कम पायाभरणी केली. पंचवार्षिक योजनांची आखणी, आर्थिक नियोजन आणि कुशल प्रशासन या क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान देशाच्या विकासात मैलाचा दगड ठरले.
 
विद्यापीठ अनुदान आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मोलाचे कार्य केले. केवळ एक प्रखर अर्थतज्ज्ञ आणि प्रशासकच नव्हे, तर संस्कृतचे गाढे अभ्यासक, संवेदनशील साहित्यिक आणि निसर्गप्रेमी म्हणूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. या सर्व लौकिकापलीकडे जाऊन, त्यांच्यातील कणखर आणि स्वाभिमानी मराठी बाणा संपूर्ण देशाने अनुभवला.
 
1960 च्या दरम्यान भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी, मराठी भाषिकांवर आणि मुंबईच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक अन्याय करणार्‍या तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरू यांच्या धोरणांविरोधात त्यांनी परखड भूमिका घेतली. सत्तेच्या पदाचा कोणताही मोह न बाळगता, त्यांनी थेट लोकसभेत आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा देऊन मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि न्याय्य हक्कांसाठी आपला आवाज बुलंद केला.
 
तत्त्वांसाठी सर्वोच्च पद त्यागण्याचे त्यांचे हे धाडस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. तळा शहरासाठी आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरतो, कारण सी. डी. देशमुख यांचे मूळ तळ्याशी घट्ट जोडलेले आहे. त्यांचे वडील द्वारकानाथ गणेश देशमुख हे मुळचे तळा येथील प्रतिष्ठित वतनदार आणि जमीनदार घराण्यातील होते, तसेच ते व्यवसायाने वकील होते. 1904 मध्ये रोहा येथे दिवाणी न्यायालय सुरू झाल्यानंतर द्वारकानाथपंत वकिलीच्या निमित्ताने सहकुटुंब रोह्याला स्थायिक झाले.
 
त्यामुळे सी. डी. देशमुख यांचे बालपण आणि पुढील शालेय शिक्षण रोह्यात पार पडले. मात्र, त्यांच्या मुळांची नाळ तळ्याशी आणि त्यांच्या जन्माची गाठ महाड तालुक्यातील नाते गावाशी जोडलेली आहे. डॉ. देशमुख यांचा जन्म महाड तालुक्यातील नाते गावी त्यांच्या आजोळी झाला. अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातील तळा, रोहा आणि नाते या तीनही ठिकाणांशी त्यांच्या जीवनाचे व आठवणींचे धागे गुंतलेले आहेत.
 
दगडी शाळेतील तैलचित्र अनावरण सोहळ्याची पार्श्वभूमीही तितकीच बोलकी आणि प्रेरणादायी आहे. 1861 मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक दगडी शाळेत कै. सी. डी. देशमुख यांनी प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली होती आणि याच शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. अनेक दिग्गज व्यक्तींनी ज्या वास्तूत ज्ञानार्जन केले, त्या ऐतिहासिक वास्तूचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने या तैलचित्राची उभारणी करण्यात आली आहे. या शाळेने अनेक वर्षांचा काळ अनुभवला असून, अलीकडेच तिचे नूतनीकरण करून तिला आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज करण्यात आले आहे.
 
जुन्या आणि नव्याचा हा संगम खरोखरच कौतुकास्पद आहे. एखाद्या ऐतिहासिक वास्तूचे केवळ भौतिक नूतनीकरण न करता, तिच्याशी निगडित थोर व्यक्तींच्या स्मृती जतन करणे, हा खर्‍या अर्थाने सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. या ऐतिहासिक वास्तूमध्ये सी. डी. देशमुख यांचे तैलचित्र साकारल्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा इतिहास भावी पिढ्यांना समजण्यास निश्चितच मदत होईल.
 
आजच्या पिढीला आपल्या मातीतील महान व्यक्तींची ओळख करून देणे, त्यांच्या शिस्तीचा, बुद्धिमत्तेचा आणि राष्ट्रसेवेचा आदर्श समोर ठेवणे, ही काळाची गरज आहे. या उपक्रमामुळे तळा शहराच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे. माजी विद्यार्थी आणि पर्यटकांसाठीही हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक पर्यटनाला आणि ऐतिहासिक वारसा पर्यटनाला यातून चालना मिळू शकते.
 
तळा येथील या स्तुत्य उपक्रमाची चर्चा करताना रायगड जिल्ह्यातील इतर ठिकाणांशी निगडित वारसा जतनाच्या प्रश्नाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आज रोहा येथे सी. डी. देशमुख यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक संस्था व स्मारकाशी संबंधित विविध उपक्रम राबवले जात आहेत. तेथे स्थानिक पातळीवर त्यांच्या वारसाचे जतन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
पण दुसरीकडे, डॉ. देशमुख यांचा जन्म ज्या नाते गावी त्यांच्या आजोळी झाला, तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत आहे. नाते येथील ही ऐतिहासिक वास्तू सध्या जीर्ण अवस्थेत असून ती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. एखाद्या थोर विभूतीच्या जन्मस्थळाशी संबंधित वास्तू अशी मोडकळीस येत असेल, तर ती केवळ एका गावाची किंवा कुटुंबाची हानी नसते, तर ती संपूर्ण इतिहासाची आणि सांस्कृतिक ठेव्याची हानी असते.
 
म्हणूनच, नाते येथील या ऐतिहासिक वास्तूचे जतन व पुनर्बांधणी करून तेथे स्मारक उभारावे, अशी नाते ग्रामस्थांची, रायगडकरांची आणि आमचीही ठाम मागणी आहे. जसे प्रयत्न रोह्यात सुरू आहेत आणि जसा सकारात्मक पुढाकार आज तळा येथील दगडी शाळेत घेतला जात आहे, तसेच ठोस आणि नियोजनबद्ध प्रयत्न नाते येथे होणे अत्यंत आवश्यक आहे.
 
केवळ भावना व्यक्त करून किंवा तैलचित्रे लावून वारसा पूर्णपणे सुरक्षित राहत नाही; त्यासाठी प्रत्यक्ष वास्तूंचे संवर्धन, निधीची उपलब्धता, प्रशासकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभाग यांची सांगड घालावी लागते. सी. डी. देशमुख यांचे जीवनकार्य हे अफाट परिश्रम, प्रशासकीय कौशल्य, तत्त्वनिष्ठा आणि मराठी बाण्याचे प्रतीक होते. त्यांच्या नावाशी जोडलेली प्रत्येक वास्तू आणि प्रत्येक आठवण जपणे हे रायगडकरांचे कर्तव्य आहे.
 
तळा येथील या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारसा जतनाची ही चळवळ अधिक व्यापक होईल, रोह्यातील उपक्रमांना अधिक बळ मिळेल आणि नाते येथील ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनालाही गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपल्या तरच वर्तमानाला अर्थ प्राप्त होतो आणि भविष्याची वाट अधिक भक्कम होते. तळा येथील या गौरवशाली सोहळ्याला मनःपूर्वक शुभेच्छा आणि नाते येथील स्मारकाच्या मागणीला खंबीर पाठिंबा!