दोन नागरिकांचे बळी, तरी प्रशासन सुस्त ! अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर दोन बळी; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी

By Raigad Times    22-Nov-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग । अलिबाग-रेवदंडा रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे कुरूळ, बेलकडे, चौल आणि नागाव परिसरातील नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे.
 
याप्रकरण शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून सदर ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी सूचना फलकांचा अभाव, अपुरे बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांना धोक्याची जाणीव करून देणार्‍या प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याचे चित्र आहे.
 
वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी, विद्यार्थी, नोकरदार तसेच रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन नागरिकांचा मृत्यू होऊनही प्रशासनाला जाग येणार नसेल, तर आणखी किती बळींची प्रतीक्षा केली जात आहे,
 
असा संतप्त सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्‍यांची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, विभागप्रमुख गिरीश शेळके, शहरप्रमुख तथा नगरसेवक संदीप पालकर, शिवसैनिक कमलेश खरवले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.