आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा ! आ.महेंद्र दळवी यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

By Raigad Times    22-Nov-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) कंपनीतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न, तसेच कामगारांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे लक्ष वेधले.
 
आमदार महेंद्र दळवी यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आरसीएफ कंपनीतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, कंपनी प्रशासनाशी संबंधित विविध मुद्दे आणि कामगारांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दळवी यांनी केली. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केंद्रीय स्तरावर हस्तक्षेप करून ठोस पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
आरसीएफ कंपनीशी. संबंधित स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त आणि कामगारांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत. त्यासाठी या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिका या भेटीत मांडण्यात आली. आगामी काळातही या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.