वणव्यांमुळे सरसगडाची होरपळ , वनसंपदा आणि पशुपक्ष्यांची वाताहत; संवर्धनाच्या कामावर पाणी

By Raigad Times    22-Nov-2026
Total Views |
bense
 
बेणसे । प्राचीन आणि ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावर वारंवार लागणार्‍या वणव्यांमुळे किल्ल्याची मोठ्या प्रमाणात होरपळ होत आहे. यामुळे येथील वनसंपदा आणि पशुपक्ष्यांचेही मोठे नुकसान होत आहे. मागील आठवड्यात सरसगडावर मानवनिर्मित वणवा लागल्याने किल्ल्याचा बहुतांश भाग जळून खाक झाला आहे.
 
या वणव्यामुळे किल्ल्यावर नव्याने लावलेली रोपे आणि संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली आहेत. परिणामी, येथील माकडे, वानरे आणि पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्यांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट होत आहे. स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
 
मात्र, किल्ल्यावरील काही ठिकाणे दुर्गम आणि धोकादायक असल्याने तेथे पोहोचून आग विझविण्यात अडचणी येतात. वणव्यांमुळे जळून काळवंडलेला किल्ला पाहून अनेकांना दुःख होत आहे.
वणव्यांमुळे वनसंपदेची वाताहत
किल्ल्याच्या चारही बाजूंनी वणवे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे येथे राहणार्‍या पशुपक्ष्यांना अन्न- पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पक्षी, माकडे, वानरे आणि इतर प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात पाली शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये येत आहेत. माकडांचा गावांमध्ये वावरही वाढला आहे. वणव्यांमुळे किल्ल्याची तटबंदी आणि बुरुजांमधील बांधकाम कमकुवत होण्याची भीती असून, काही ठिकाणी दगड घसरून खाली येत आहेत.
संवर्धनाच्या कामावर पाणी
स्थानिक दुर्गप्रेमी, विविध दुर्गसंवर्धन संस्था आणि संघटनांकडून किल्ल्याच्या स्वच्छतेची कामे केली जात आहेत. तसेच गडावर वृक्षारोपण करून झाडांचे संवर्धनही केले जात आहे. किल्ल्याच्या जतनासाठी या संस्था आणि संघटनांचे मोठे योगदान आहे. मात्र, वारंवार लागणार्‍या वणव्यांमुळे वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या कामावर पाणी फिरत आहे.