पनवेल । 14 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या पनवेल येथील क्रिकेट मैदानावर पुन्हा अडीच कोटी रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीकडे सुपूर्द केलेले हे मैदान तयार करताना ठेकेदाराने माती खाल्ली? अर्थात, निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे या मैदानावर पुन्हा गवत लावण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
महापौर नितीन पाटील यांनी अडिच कोटींचा प्रस्तावाला मंजुरी देताना, चौकशीसोबतच संबंधित ठेकेदाराच्या बिलातून दुरुस्तीचा खर्च वसूल करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.पनवेलमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचे असलेले हे मैदान महापालिकेने मोठा निधी खर्च करून विकसित केले होते.
मात्र, मैदानाचा वापर सुरू झाल्यानंतर काही काळातच दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीकडून अडीच कोटी रुपये दुरुस्तीसाठी मागण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी दि.19 नोव्हेंबर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. प्रस्तावावर बोलताना, मैदानाच्या दुरवस्थेला निकृष्ट दर्जाचे साहित्य कारणीभूत असेल, तर त्याचा आर्थिक भुर्दंड पनवेलकर नागरिकांनी का सोसायचा, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी उपस्थित केला.
कामाचा दर्जा तपासून संबंधित ठेकेदार आणि अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करावी. तसेच, कामात त्रुटी आढळल्यास दुरुस्तीचा खर्च ठेकेदाराकडून वसूल केल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी सर्वसाधारण सभेत केली. मैदानाचा विकास आणि खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक असले, तरी आधीच्या कामातील त्रुटींचा भार पुन्हा महापालिकेच्या तिजोरीवर टाकणे योग्य नाही. एखाद्या कामावर यापूर्वी खर्च झाला असेल आणि त्याच मैदानासाठी पुन्हा अडीच कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव असेल, तर त्यामागील आर्थिक औचित्य आणि जबाबदारी स्पष्ट झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
देखभाल खर्च अकॅडमीनेच करावा - नगरसेवक लतिफ शेख
सेक्टर 11 येथील मैदानाला ‘राजीव गांधी मैदान’ असे नाव देण्याबाबत सिडकोच्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट उल्लेख असताना, त्याच्या नामकरणाबाबत वेगळा विचार करण्याची गरज काय, असा सवाल नगरसेवक लतिफ शेख यांनी उपस्थित केला. अकॅडमीला मैदान देताना पनवेल महापालिका क्षेत्रातील तसेच रायगड जिल्ह्यातील मुलांना मिळणार्या संधींबाबत करारात स्पष्ट तरतुदी असल्याचे त्यांनी सांगितले.
या अटींची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही, याची प्रशासनाने खातरजमा करावी, अशी मागणी त्यांनी केली. मैदानाच्या देखभालीसाठी लागणारे रोलर, गवत कापण्याचे यंत्र आणि इतर आवश्यक साहित्य करारानुसार अकॅडमीने स्वतः खरेदी करणे अपेक्षित असल्याचे शेख यांनी निदर्शनास आणून दिले.
खर्च ठेकेदाराकडून वसूल करा- प्रकाश बिनेदार
पनवेलमधील लेदर क्रिकेट मैदानावर नव्याने हिरवळ उभारण्यासाठी जीएसटीसह 2 कोटी 47 लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडण्यात आला. मात्र, यापूर्वी लावलेली हिरवळ अवघ्या एक ते दीड वर्षांत खराब झाल्याने पुन्हा खर्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आधीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणार्या ठेकेदाराकडून दुरुस्तीचा खर्च वसूल करावा, अशी मागणी सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी केली.
वा, अशी भूमिका बिनेदार यांनी मांडली. यावेळी नगरसेवक समीर ठाकूर आणि संतोष शेट्टी यांनी मैदानालगत असलेल्या दुसर्या मैदानाच्या विकासाचाही मुद्दा उपस्थित केला. सुकापूर परिसरासह पनवेल महापालिका हद्दीतील आजूबाजूच्या भागांमधील नागरिक या मैदानावर येतात. मात्र, तेथे पुरेशा सुविधा नसल्याने संबंधित मैदान महापालिकेने ताब्यात घेऊन विकसित करावे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या विषयावर नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, सुमित झुंजारराव, रामदास शेवाळे, प्रकाश म्हात्रे, लीना गरड यांच्यासह अन्य सदस्यांनी मते मांडली. सभागृहातील चर्चेला उत्तर देताना महापौरांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराने मैदानाचे काम उत्कृष्ट दर्जाचे केल्याचा दावा केला असला, तरी अवघ्या काही काळात पुन्हा दुरुस्तीची वेळ येणे ही गंभीर बाब आहे.
दुरुस्तीसाठी प्रस्तावित रक्कम महापालिकेच्या तिजोरीतून खर्च करण्याऐवजी संबंधित ठेकेदाराच्या बिलातून वसूल करावी, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, चौकशी अहवालातून कोणाची जबाबदारी निश्चित होते आणि दुरुस्तीचा खर्च ठेकेदाराकडून वसूल केला जातो का, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.