वाघोशी । पाली शहरातील प्रलंबित नागरी समस्या आणि प्रस्तावित घरपट्टी करवाढीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत करवाढीचा अतिरिक्त बोजा लादण्याच्या निषेधार्थ आज (2 नोव्हेंबर) पाली नगरपंचायतीवर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.
पाली सुधागड संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली या आंदोलनासंदर्भात नगरपंचायत, पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. शहरातील नागरिक नियमितपणे कर भरत असतानाही त्यांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार संघर्ष समितीने केली आहे.
त्यामुळे नगरपंचायतीने मागील पाच वर्षांतील उत्पन्न आणि खर्चाचा तपशील, तसेच पूर्ण झालेली व प्रलंबित विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. विकासकामांचा हिशेब आणि पारदर्शकता आणल्याशिवाय कोणतीही करवाढ स्वीकारली जाणार नाही, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.
हा मोर्चा पालीकरांच्या मूलभूत हक्कांसाठी असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि घरपट्टी हे प्रश्न थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. त्यामुळे पाली शहरातील नागरिक, व्यापारी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.