कर्जत । कर्जत तालुक्यातील पाली-सायडोंगर येथे प्रस्तावित असलेला टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी आज, 2 नोव्हेंबर रोजी कर्जत तालुका बंद ठेवण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाने केले आहे. सायडोंगर परिसरातील वृक्षतोडीप्रकरणी स्वतंत्र चौकशी करुन दोषींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पक्षाने केली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कर्जत तालुक्यातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या तीन हजार मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून संघर्ष तीव्र झाला आहे. सायडोंगर परिसरात वन विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या वृक्षतोडीवरूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकल्पामुळे जंगलावर अवलंबून असलेल्या स्थानिक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रानमेवा, मध, औषधी वनस्पती आणि विविध रानभाज्यांमधून मिळणारे उत्पन्न बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामसभा, वनहक्क आणि आदिवासींचा सहभाग यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियांचे योग्य पालन झाले आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सायडोंगर परिसरातील जंगलात बिबट्या, शेकरू, मोर यांसह विविध वन्यजीवांचा अधिवास आहे. प्रस्तावित वृक्षतोडीमुळे या जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे. या प्रकल्पामुळे उल्हास आणि पेज नदीच्या जलस्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्जत तालुक्यातील अनेक गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, मोठ्या प्रकल्पासाठी पाण्याचा वापर वाढल्यास भविष्यात पाणीप्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. या सर्व मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाने तालुका बंदचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.