कर्जत बंदला भाजपचा विरोध

By Raigad Times    02-Nov-2026
Total Views |
 karjat
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील पाली-सायडोंगर परिसरात प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी कर्जत तालुका बंदचे आवाहन केले आहे. मात्र, या बंदला भारतीय जनता पक्षाने विरोध दर्शविला आहे.
 
भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी प्रस्तावित कर्जत बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा सण असून, सणाच्या किमान 15 दिवस आधीपासून बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्रीला वेग येतो.
 
स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिक या काळात मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून साठा करतात. दिवाळीच्या सणातून चांगला व्यवसाय होईल, अशी त्यांची अपेक्षा असते. अशा परिस्थितीत दिवाळीला अवघा आठवडा शिल्लक असताना तालुका बंद पुकारणे चुकीचे असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर आंदोलन करण्यास कोणाचाही विरोध नाही; मात्र त्यासाठी दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या तोंडावर बंद पुकारणे योग्य नाही. यामुळे कर्जत तालुक्यातील दुकानदार आणि व्यापार्‍यांचे आर्थिक नुकसान होईल, अशी भूमिका किरण ठाकरे यांनी मांडली.