अलिबाग । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा तालुक्यात शिवसेनेने मोठे शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीला राजकीय धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर, रोहा पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख आणि पेणचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. बी. पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 नोव्हेंबर) शिवसेनेत प्रवेश केला.
रोह्यातील हा पक्षप्रवेश केवळ पक्षांतर नसून रायगडच्या राजकारणात नव्या राजकीय संघर्षाची नांदी ठरणार आहे, असे मंत्री भरत गोगावले म्हणाले. मंत्री गोगावले, आ. महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत रोह्याच्या ऐतिहासिक राम मारुती चौकात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी रोह्यातील या पक्षप्रवेशाचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले.
“सामाजिक आणि राजकीय जीवनात आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”, अशी ग्वाही त्यांनी दिली. राम मारुती चौकातील सभेला झालेली गर्दी पाहून विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. “मागील नगरपालिका निवडणुकीच्या वेळी रोहा बदलतोय अशी चर्चा होती.
आता रोहा बोलतोय असे म्हणण्याची वेळ आली आहे. रायगडमध्ये यापुढे भगवे वादळ घोंगावणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुतीचा धर्म पाळण्याबाबत विरोधकांना सुनावताना त्यांनी तटकरे कुटुंबावरही जोरदार टीका केली.
रोहा आता बोलायला लागलाय-आ.दळवी
आ.महेंद्र दळवी म्हणाले, रायगड आता बदलत असून रोहा आता बोलायला लागला आहे, तटकरेंचे शंभर अपराध पूर्ण झालेत. यापुढेही तटकरे कुटुंब सोडून आघाडी हाच आमचा पॅटर्न राहील. तसेच नगरपालिका निवडणुकीमध्ये आमचा मच्छर गद्दार निघाला त्याला परत घेऊ नका, असे आम्ही भरतशेठना सांगितले आहे, असेही दळवी म्हणाले.
याप्रसंगी विजयराज खुळे यांनीही आक्रमक भूमिका मांडली. रोह्यातील राजकीय विरोधकांवर टीका करत त्यांनी आगामी काळात त्यांना राजकीय आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला. जितेश मुंढे यांनी भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत यापुढे कोणालाही घाबरणार नसल्याचे सांगितले. तटकरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाला आव्हान देत त्यांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याची भीष्मप्रतिज्ञा करणार असल्याचेही खुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले.
स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रवेश
राष्ट्रवादीतील जबाबदारी आणि कामाच्या संधींबाबत नाराजी व्यक्त करत प्रमोद म्हस्कर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. रोह्यातील औद्योगिक वसाहतीत गेल्या चार दशकांत नवीन कारखान्यांची भर पडलेली नाही. रोजगार, पाणीटंचाई आणि शेतीच्या पाण्याचे नियोजन असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रोह्यात शिवसेना मजबूत करण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहा पंचायत समितीचे सदस्य सुरेश मगर यांनी राष्ट्रवादीकडून आश्वासने देऊनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची नाराजी व्यक्त केली.
राजकीय आश्वासनांबाबत झालेल्या भ्रमनिरासामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे सांगत रोह्यासह संपूर्ण रायगडमध्ये शिवसेनेची ताकद वाढविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पेणचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. बी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला. यापूर्वी शेकाप आणि भाजपमध्ये काम करताना कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त करून पेण परिसरात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना जिल्ह्यात एक नंबरवर आणण्याचे आवाहन
विकास गोगावले यांनी रायगड जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे सांगितले. सलग सुरू असलेल्या पक्षप्रवेशांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात पक्षाला जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. श्रीवर्धनचा आमदार आणि रायगडचा खासदार शिवसेनेचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला विकास गोगावले, प्रमोद घोसाळकर, अनिल नवगणे, ज्ञानदेव पवार, संतोष पोटफोडे, उदेश वाडकर, अमित उकडे, संदेश मोरे, अशोक धोत्रे, माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे, पूजा पोटफोडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि हजारो समर्थक उपस्थित होते. नव्याने प्रवेश केलेल्या प्रमुख नेत्यांसह त्यांच्या समर्थकांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले.
घोषणाबाजीने संपूर्ण राम मारुती चौक परिसर दणाणून गेला. या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सुनील तटकरे यांच्या प्रभावक्षेत्रात शिवसेनेने केलेले हे शक्तिप्रदर्शन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे मानले जात आहे. या राजकीय आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेस कशाप्रकारे प्रत्युत्तर देते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.