पनवेल । पनवेल महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला आता गव्हाण आणि वडघर परिसरातून विरोध होऊ लागला आहे. या दोन जिल्हा परिषद गटांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्याचा ठराव विशेष महासभेत मंजूर करण्यात आला असला, तरी या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचे स्वतंत्र अस्तित्व आणि प्रशासकीय स्वायत्तता धोक्यात येण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या प्रस्तावाविरोधात आज (18 नोव्हेंबर) महापालिका मुख्यालयासमोर गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात अजित म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. गावांचा विकास व्हावा, याबाबत कोणाचेही दुमत नाही; मात्र विकासाच्या नावाखाली ग्रामपंचायतींचे अधिकार आणि स्वतंत्र ओळख संपविणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गावांच्या गरजा आणि विकासाचे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातात. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत समावेश करताना ग्रामस्थांचे मत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार विचारात घेणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागाची स्वतंत्र ओळख व प्रशासकीय स्वायत्तता कायम ठेवावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, पनवेल तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनाही पाठविण्यात आले आहे. गव्हाण, वडघर परिसरातील या विरोधामुळे मनपा हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.