अलिबागहून आंब्याची पहिली पेटी बाजारात , आंबा बागायतदार डॉ.संदेश पाटील यांनी मिळवला मान

वाशीत आज होणार लिलाव

By Raigad Times    18-Nov-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग । ‘कोकणचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या हापूस आंब्याच्या हंगामाची यंदा नोव्हेंबर महिन्यातच चाहूल लागली आहे. अलिबागमधील आंबा उत्पादक डॉ. संदेश पाटील यांनी आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या नऊ पेट्या 17 नोव्हेंबर रोजी वाशी येथील घाऊक बाजारपेठेत विक्रीसाठी रवाना केल्या आहेत.
 
त्यामुळे रायगड जिल्ह्यातील यंदाच्या आंबा हंगामाची सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्याला हापूस आंबा उत्पादनाची समृद्ध परंपरा लाभली असून, येथील हवामान आणि नैसर्गिक परिस्थिती आंबा लागवडीसाठी पोषक आहे. दरवर्षी आंबा हंगामाची शेतकरी आणि व्यापारी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा नोव्हेंबरमध्येच पहिली खेप बाजारपेठेत दाखल झाल्याने आंबा बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 
डॉ. संदेश पाटील यांनी आपल्या बागेतील दोन डझन आंब्यांची क्षमता असलेल्या नऊ पेट्या वाशी मार्केटमध्ये पाठवल्या आहेत. या आंब्यांचा आज बुधवार, 18 नोव्हेंबर रोजी लिलाव होणार असून, लिलावानंतरच आंब्याचा प्रत्यक्ष बाजारभाव निश्चित होणार आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच दाखल झालेल्या अलिबागच्या हापूसला किती भाव मिळतो, याकडे जिल्ह्यातील आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
 
याबाबत डॉ.संदेश पाटील म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यातच आपल्या बागेतील आंबा विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये पाठवता आला, ही आनंदाची बाब आहे. आंब्याचे दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी वर्षभर बागेची निगा, झाडांचे योग्य व्यवस्थापन आणि आवश्यक काळजी घ्यावी लागते.
 
त्यातून मिळालेल्या उत्पादनाच्या पहिल्या नऊ पेट्या बाजारपेठेत पाठवल्या आहेत. या हापूसला योग्य दर मिळेल, अशी अपेक्षा असून यंदाचा हंगाम बागायतदारांसाठी समाधानकारक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हंगामाच्या सुरुवातीलाच अलिबागचा हापूस वाशीच्या बाजारपेठेत दाखल झाल्याने आगामी आंबा हंगामाबाबत उत्सुकता वाढली आहे.