खोपोली | दिवाळीच्या सणाचा आनंदोत्सव सुरू असतानाच खोपोली शहरात एका धक्कादायक हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कारमेल स्कूलजवळील भानवज परिसरातील इंद्रप्रस्थ इमारतीत एकट्याच राहणार्या ७० वर्षीय महेश्वरी रामचंद्रन (मूळ रा. केरळ) या वृद्ध महिलेची हात-पाय बांधून निर्घृण हत्या करण्यात आली.
त्यांच्या अंगावरील मौल्यवान दागिने लुटल्यानंतर आरोपींनी घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केले. नातेवाईकांनी केलेल्या शोधाशोधीनंतर हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी विवेकानंद मार्गावरील कारमेल स्कूलजवळ असलेल्या इंद्रप्रस्थ इमारतीत महेश्वरी रामचंद्रन या एकट्याच वास्तव्यास होत्या. बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सु ारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला.
त्यानंतर महिलेचे हात-पाय बांधून त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी त्यांच्या अंगावरील मौल्यवान दागिने लंपास करण्यात आले. तसेच घरातील वस्तू अस्ताव्यस्त करण्यात आल्या. महिलेचा मृतदेह घरातच ठेवून आरोपींनी दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि त्या घरी नसल्याचा भास निर्माण केला. दरम्यान, महेश्वरी यांचे घर बंद असल्याचे पाहून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्या कुठे गेल्या आहेत, याची माहिती मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता तो घरातच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता महेश्वरी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवतरे, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल पाटील आणि खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथक, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथक आणि जिल्हा प्रयोगशाळेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी घटनास्थळावरील पुरावे संकलित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एकट्या राहणार्या वृद्ध महिलेची हत्या करून घराला बाहेरून कुलूप लावून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेणे हे खोपोली पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. या हत्येागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.