कर्जत स्थानकात एस्प्रेस गाड्या पुन्हा थांबणार ? खा.सुनील तटकरेंचा पुढाकार

मध्य रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक चचा

By Raigad Times    13-Nov-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकात कोरोना काळात बंद करण्यात आलेले लांब पल्ल्याच्या एस्प्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच नेरळ रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी कायमस्वरूपी ‘पे अँड पार्क’ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
 
या दोन्ही प्रश्नांवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत प्रत्यक्ष स्थळपाहणीचे निर्देश दिले आहेत. या मागण्यांसंदर्भात खा.सुनील तटकरे यांनी मुंबई येथील मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयात वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे उपस्थित होते. मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक हरीश मीना यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
 
कोरोना महामारीच्या काळात कर्जत रेल्वे स्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या एस्प्रेस गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. कोरोना निर्बंध संपल्यानंतरही हे थांबे पुन्हा सुरू न झाल्याने कर्जत, नेरळ तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्रवाशांना अन्य स्थानकांवर जावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत आहे.
 
त्यामुळे कोरोना काळात बंद झालेले सर्व प्रवासी थांबे पूर्ववत करण्याची आग्रही मागणी खा.तटकरे यांनी केली. याशिवाय जोधपूरच्या दिशेने जाणार्‍या नवीन रेल्वे गाडीला कर्जत स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणीही बैठकीत मांडण्यात आली. कर्जत हे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे जंशन असल्याने या ठिकाणी एस्प्रेस गाड्यांचे थांबे उपलब्ध झाल्यास स्थानिक प्रवाशांसह पर्यटक आणि व्यापार्‍यांनाही मोठा फायदा होणार आहे.
 
नेरळ रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या उपलब्ध जागेत प्रवाशांसाठी ‘पे अँड पार्क’ सुविधा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यामुळे स्थानकात येणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या दोन्ही मागण्यांची दखल घेत रेल्वे अधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांसह प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बैठकीला कर्जत नगरपरिषदेचे सत्ताधारी गटनेते महेंद्र चंदन, स्वीकृत नगरसेवक राजा कोठारी, व्यापारी सुभाष सोळंकी, प्रकाश ओसवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या पाठपुराव्यामुळे कर्जत आणि नेरळमधील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.