पाणी टंचाईचे संकट ! माणगावकरांनाही एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार

काळ नदीच्या पाणीपातळीत मोठी घट; जलसाठ्यांचे जतन आवश्यक

By Raigad Times    13-Nov-2026
Total Views |
mangoan news
 
माणगाव | अपुरा पाऊस, सप्टेंबर-ऑटोबर महिन्यांत पावसाने फिरवलेली पाठ आणि नोव्हेंबरमध्येही कायम असलेला उन्हाचा कडाका यामुळे माणगाव शहरातील जलस्रोतांवर ताण वाढू लागला आहे. काळ नदीच्या पाणीपातळीत मोठी घट झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शयता आहे.
 
ही परिस्थिती लक्षात घेऊन माणगाव नगरपंचायतीने दिवाळीनंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकार्‍यांनी या निर्णयाला दुजोरा दिला असून, दिवाळीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी श्री. बुवा यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या सणात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सणानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत नगरपंचायतीकडून स्वतंत्र अधिकृत घोषणाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काळ नदीचे पात्र आटले
माणगाव शहराची प्रमुख जलवाहिनी असलेल्या काळ नदीच्या पात्रातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. अनेक ठिकाणी नदीपात्रातील दगड उघडे पडल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यात अपेक्षित जलसाठा निर्माण न झाल्याने आगामी उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान नगरपंचायतीसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रिक्षाद्वारे दवंडी; १७ प्रभागांत जनजागृती
दरम्यान, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगरपंचायतीने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. वाहन धुणे, रस्ते स्वच्छ करणे तसेच झाडांना अनावश्यक पाणी घालणे टाळावे, असे आवाहन ध्वनिसंदेशाद्वारे करण्यात येत आहे. याशिवाय रिक्षांमधून दवंडी देऊन नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
 
शहरातील एकूण १७ प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्यापूर्वी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. घरगुती वापरात पाण्याची बचत करणे, अनावश्यक वापर टाळणे आणि उपलब्ध जलसाठ्याचे जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी माणगावकरांनी आतापासूनच पाणी बचतीचा संकल्प करण्याची गरज आहे.