अलिबाग | रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योग, प्रकल्प आणि धरणांची उभारणी होणे आवश्यक आहे. प्रकल्पांसाठी वृक्षतोड करावी लागली, तर त्यापेक्षा अधिक वृक्षलागवड करता येऊ शकते. मात्र, प्रत्येक प्रकल्पाला विरोध होत राहिला, तर उद्योग आणि रोजगाराच्या संधी अन्य राज्यांत जातील, अशी भूमिका पालकमंत्री भरत गोगावले यांनी मांडली आहे.
पालकमंत्री भरत गोगावले यांनी गुरुवारी (दि.१२ नोव्हेंबर) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अलिबागचे आ.महेंद्र दळवी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रस्तावित प्रकल्प, औद्योगिक विकास, शेती नुकसान भरपाई, स्थानिक रोजगार या विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जिल्ह्यात उद्योग आले नाहीत, प्रकल्प, धरणे झाली नाहीत तर पुढे सुबत्ता कशी येणार? तरुणांना रोजगार कसा मिळणार? त्यामुळे जिल्ह्याचा विकास करायचा असेल आणि स्थानिक तरुणांच्या हाताला काम द्यायचे असेल, तर रायगडमध्ये प्रकल्प आलेच पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री भरत गोगावले यांनी मांडली. नवी मुंबई विमानतळामुळे परिसरात विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
तिसर्या मुंबईच्या उभारणीच्या दिशेनेही हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या औद्योगिक आणि नागरी गरजांसाठी पुरेसे पाणी व वीज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या सुविधा देऊ शकलो नाही, तर उद्योग रायगडमध्ये येण्याऐवजी गुजरात किंवा अन्य राज्यांकडे वळू शकतात, असे त्यांनी सांगितले. प्रकल्पांसाठी हजारो वृक्ष तोडावे लागले, तर त्याबदल्यात तेवढीच वृक्षांची लागवड करता येऊ शकते.
त्यामुळे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. रायगड जिल्ह्यात मोठे प्रकल्प येत असले, तरी त्या तुलनेत स्थानिक तरुणांना पुरेशा प्रमाणात रोजगार मिळत नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर सरकारचे ८० टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याचे धोरण असल्याचे गोगावले यांनी सांगितले. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी कंपन्या आणि प्रकल्प व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही शिवसेना एकत्र येणार? राजकारणात काहीही घडू शकते; गोगावले यांची गुगली
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आपल्याला सर्वाधिक आनंद होईल, असे विधान केले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचीही चर्चा रंगली आहे. याबाबत विचारले असता, सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आपल्याला दिसत नसल्याचे गोगावले यांनी म्हटले.
मात्र, राजकारणात कधीही काहीही घडू शकते. सकाळचे चित्र संध्याकाळी आणि संध्याकाळचे चित्र सकाळी बदलू शकते. त्यामुळे भविष्यात काय घडेल, हे सांगता येत नाही, असे सूचक विधान त्यांनी केले. गुलाबराव पाटील यांना याबाबत काही संकेत मिळाले असतील, तर येत्या मंगळवारी होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनाच याबाबत विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानिक तरुणांना ८० टक्के रोजगार देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांशी बोलणार - ना. गोगावले