रोहा | रोहा येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. तसेच श्रीवर्धन येथील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले.
या भेटीमुळे रोहा रेल्वे स्थानकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनाबाबतच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुनील तटकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट प्रामुख्याने दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या भेटीदरम्यान रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकासकामांचा विषयही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला.
रोहा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक उभारण्याच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, अशी विनंती त्यांनी केली. त्याचबरोबर श्रीवर्धन येथील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठीही त्यांनी फडणवीस यांना निमंत्रण दिले. विकासकामांवर लक्ष केंद्रित करून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे हाच आपला स्थायी स्वभाव असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.
रदरम्यान, मंडणगड नगरपंचायतीसाठी मंजूर झालेल्या ४१.६९ कोटी रुपयांच्या अमृत- २ पाणीपुरवठा योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. या योजनेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हा प्रकल्प साकार होत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना, आपल्या पाठपुराव्याचे पुरावे वेगळे दाखविण्याची गरज नसून, आपण केलेले प्रयत्न सर्वांना माहीत असल्याचे त्यांनी म्हटले.