महाड येथील बेपत्ता ग्रामसेवकाचा जंगलात मृतदेह ; महाड येथील बेपत्ता ग्रामसेवकाचा जंगलात मृतदेह

By Raigad Times    13-Nov-2026
Total Views |
mahad
 
महाड | महाड येथून बेपत्ता झालेले ग्रामसेवक गजानन गाढवे यांचा मृतदेह दहिवड गावाजवळच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. गाढवे यांच्या यांच्या भावाने अपहरण झाल्याचा संशय तक्रारीत व्यक्त केला होता. मात्र मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. ग्रामसेवकांच्या अशाप्रकारे मृत्यूने महाड तालुक्यात खळखळ उडाली आहे.
 
गजानन विठ्ठल गाढवे (वय ३५, मूळ रा. भोसा, जि. बुलढाणा) हे महाड तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सध्या ते शिरगाव येथे महेश जाधव यांच्या घरी वास्तव्यास होते. ५ नोव्हेंबर रोजी ते कामानिमित्त महाड पंचायत समितीत गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.
 
बराच वेळ होऊनही ते न परतल्याने कुटुंबीय आणि परिचितांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला. शोध केल्यानंतर कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांचे भाऊ विलास गाढवे यांनी ८ नोव्हेंबर रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीत गजानन यांचे अपहरण झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.
 
यानंतरही नातेवाईकांसह त्यांच्या सहकारी ग्रामसेवकांकडूनही गजानन यांचा शोध सुरू होता. अशातच ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दहिवड गावाच्या पश्चिमेकडील जंगल परिसरात गजानन यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. बेपत्ता ग्रामसेवकाचा अशा निर्जन ठिकाणी मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
 
पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार, नशेच्या अवस्थेत गाढवे यांनी कोणते तरी औषध प्राशन केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील पोलीस तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.