अलिबाग | दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वावर अलिबागमधील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आणि दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळाचा परिसर तब्बल २ हजार ४०० दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. स्वराज्याच्या इतिहासातील ज्ञातअज्ञात वीरांप्रति कृतज्ञता व्यक्त करत शिवराय आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांना दीपोत्सवाच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात आली.
या सोहळ्याने ऐतिहासिक वारशाचे स्मरण करत शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान अलिबाग विभाग, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक उत्सव समिती, कुलाबा ढोल-ताशा ध्वज पथक आणि शिवशंभू प्रेमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी दीपावली पाडव्याला हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही शेकडो दिव्यांच्या रोषणाईने ऐतिहासिक स्मारकांचा परिसर उजळून निघाला.
दिव्यांच्या प्रकाशात शिवरायांच्या शौर्याची आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी पराक्रमाची आठवण जागवण्यात आली. या सोहळ्याला सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे तसेच अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे उपस्थित होते. अलिबागमधील शेकडो तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दीपोत्सव यशस्वी केला. ऐतिहासिक स्मारकांप्रती आदर व्यक्त करण्याबरोबरच नव्या पिढीमध्ये स्वराज्याचा इतिहास आणि परंपरा जिवंत ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कुलाबा किल्ल्यात मशालींचा भव्य दीपोत्सव यावेळी रघुजीराजे आंग्रे यांनी पुढील वर्षी वसुबारसच्या दिवशी कुलाबा किल्ल्यात शेकडो मशाली प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे शिवप्रेमींमध्ये आगामी सोहळ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ऐतिहासिक वारसा जपणार्या अशा उपक्रमांमुळे अलिबागच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला नवी झळाळी मिळत आहे.