कर्जत | सायडोंगरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी जमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्याने संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात जमिनीचे सीमांकन आणि मोजणी करण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना स्थानिक नागरिक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत माघारी जाण्यास भाग पाडले.
सायडोंगर परिसरातील जंगलतोडीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर या प्रकल्पाविरोधात राज्यभरातून आवाज उठत आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांसह विरोधी पक्षांनीही वृक्षतोडीविरोधात भूमिका घेतल्याने सरकारवर दबाव वाढला आहे.
त्यामुळे प्रकल्पाबाबत सरकार नरमाईची भूमिका घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच जमिनीच्या सर्वेक्षणासाठी कर्मचारी पोहोचल्याने स्थानिकां ध्ये पुन्हा संताप निर्माण झाला आहे. धरण परिसरातील जमीन आणि प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणारी वीज राज्याच्या विविध भागांत पोहोचवण्यासाठी उच्चदाब वीजवाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक जमि नीचे सर्वेक्षण आणि सीमांकन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली.
काही कर्मचारी प्रत्यक्ष मोजणीसाठी सायडोंगर परिसरात पोहोचल्याचे समजताच स्थानिकांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बाजीराव दळवी यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच दळवी यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचार्यांना जाब विचारण्यात आला. संबंधित कर्मचार्याने आपले नाव बबलू अहिरवार असून आपण मध्य प्रदेशातील असल्याचे सांगितले.
दिल्लीस्थित एका कंपनीच्या माध्यमातून उच्चदाब वीजवाहिनीच्या सर्वेक्षणासाठी आल्याची माहितीही त्याने दिल्याचे समजते. मात्र, स्थानिकांचा विरोध लक्षात घेता दळवी आणि शिवसैनिकांनी संबंधित कर्मचार्यांना काम थांबवून परिसरातून माघारी जाण्यास सांगितले. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम होऊ शकले नाही.
दरम्यान, वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला मिळालेला व्यापक प्रतिसाद पाहता सरकारने या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेबाबत स्पष्ट भूमि का मांडावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. एका बाजूला वृक्षतोड थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत असताना दुसरीकडे जमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या हालचाली सुरू असल्याने आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
३ हजार मेगावॉटचा प्रकल्प; ३७० हेक्टर जमिनीची आवश्यकता
टोरंट पॉवर कंपनीचा सायडोंगर परिसरातील प्रस्तावित पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प सुारे तीन हजार मेगावॉट क्षमतेचा आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ३७० हेक्टर क्षेत्राची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते. प्रकल्पाच्या अनुषंगाने होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणीय परिणामांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस वन विभागाने वृक्षतोडीचे काम थांबविल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता जमीन मोजणी आणि वीजवाहिनीच्या सर्वे क्षणाच्या हालचाली सुरू झाल्याने प्रकल्पविरोधी आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.
‘सायडोंगरात कोणालाही येऊ देणार नाही’
जंगल, पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांचा प्रश्न असल्याने सायडोंगर परिसरात कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण किंवा प्रकल्पाच्या अनुषंगाने काम करण्यास स्थानिकांचा विरोध राहील, अशी भूमिका ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. वृक्षतोड थांबवून प्रश्न सुटलेला नाही. प्रकल्पाच्या पुढील हालचालीही थांबल्या पाहिजेत, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे सायडोंगरचा संघर्ष आता केवळ वृक्षतोडीपुरता मर्यादित न राहता जमीन, पर्यावरण आणि प्रस्तावित वीजवाहिनीच्या प्रश्नावरही केंद्रित होताना दिसत आहे.