मुरूड-जंजिरा | दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुरूड तालुक्यातील काशीद आणि मुरूड समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची मोठी मांदियाळी जमली आहे. शनिवारी या दोन्ही समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहिली आंघोळ आणि लक्ष्मीपूजनाचा विधी उरकल्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून हजारो पर्यटकांनी समुद्रकिनार्यांकडे धाव घेतली.
परिसरात सुारे एक हजार वाहने दाखल झाल्याची माहिती स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी दिली. नवरात्रोत्सवापर्यंत मुरूड तालुक्यातील पर्यटन व्यवसाय काहीसा थंडावला होता. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, निवास व्यवस्था पुरविणारे व्यावसायिक आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिक चिंतेत होते. जंजिरा जलदुर्गाकडेही पर्यटकांची संख्या घटली होती. मात्र, दिवाळी पाडव्यापासून पर्यटनाचे चित्र बदलले असून काशीद, मुरूड, नांदगाव आणि परिसरातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि निवास व्यवस्था पुन्हा गर्दीने फुलल्या आहेत. दिवाळीची शालेय सुट्टी संपेपर्यंत पर्यटकांची वर्दळ कायम राहील, असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी वाढली आहे. राजपुरी जेट्टी, खोरा बंदर जेट्टी आणि दिघी बंदर जेट्टी येथून जलमार्गाने जंजिर्यावर जाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देत आहेत.
सध्या हवामान पर्यटनासाठी अनुकूल असल्याने काशीद, नांदगाव आणि बारशिव समुद्रकिनार्यांवर येणारे पर्यटक जंजिरा जलदुर्ग पाहण्यासही प्राधान्य देत आहेत. अनेक दिवसांपासून रोडावलेली पर्यटकांची संख्या पुन्हा वाढल्याने आगामी पर्यटन हंगाम चांगला जाईल, अशी आशा व्यावसायिकांना आहे. समुद्रकिनार्यांबरोबरच धार्मिक पर्यटनालाही पर्यटकांकडून पसंती मिळत आहे.
नांदगाव येथील सिद्धिविनायक देवस्थान, मुरूड येथील श्री दत्त देवस्थान आणि साळाव येथील गणेश देवस्थान येथे पर्यटक दर्शनासाठी जात आहेत. कुटुंबासह आलेले पर्यटक समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि धार्मिक स्थळांना भेट देऊन सुट्टीचा आनंद घेत आहेत. मुरूड समुद्रकिनार्यावर नव्याने सुरू झालेल्या पार्किंग सुविधे ुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे. वाहनतळावरून काही पायर्या उतरल्यावर थेट समुद्रकिनार्यावर पोहोचता येत असल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळत आहे. समुद्रकिनार्याच्या सुशोभीकरणाचाही पर्यटनवाढीला फायदा होत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
मात्र, पर्यटकांनी मुरूडमध्ये केवळ एक दिवस न थांबता दोन दिवस मुक्काम करावा, यासाठी पालिकेने अधिक नियोजन करण्याची गरज आहे. पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक सुविधा सुरू करणे, मुरूडमधील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पर्यटन वाहनाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
जंजिरा आणि पद्मदुर्ग हे दोन्ही किल्ले, कुड्यां- मांदाड लेणी, दत्त मंदिर, ईदगाह आणि गारंबी धबधबा या पर्यटनस्थळांचा समावेश असलेले नियोजनबद्ध पर्यटन पॅकेज तयार केल्यास पर्यटकांचा मुक्काम वाढू शकतो. त्यातून स्थानिक पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
या पर्यटन हंगामात मुरूडच्या सुक्या मासळीला विशेष मागणी असून ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठीही पर्यटक मुरूडकडे वळत आहेत. समुद्रकिनार्यावरील पर्यटनाबरोबरच खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याकडे पर्यटकांचा कल दिसून येत आहे. मुरूडच्या दरबार रोडवरील हॉटेल शोरलाइन या पूर्ण शाकाहारी हॉटेललाही अनेक पर्यटकांनी भेट देऊन स्वादिष्ट शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेत आहेत. - धर्मेश मोरे, हॉटेलचे व्यवस्थापक, मुरुड