अलिबाग | श्रीवर्धन समुद्रकिनार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मंजूर झाले आहे. विशेष म्हणजे, हा बहुमान मिळविणारा श्रीवर्धन हा महाराष्ट्रातील पहिला समुद्रकिनारा ठरला असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशलमिडीयावरुन दिली. याशिवाय कोकणातील गुहागर आणि लाडघर या समुद्रकिनार्यांचाही या मानांकनासाठी समावेश झाला आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षांपासून श्रीवर्धन समुद्रकिनार्याला ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. या काळात विविध स्तरांवर बैठका घेऊन किनार्याची स्वच्छता, पर्यावरणीय गुणवत्ता आणि आवश्यक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आल्या.
या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरुप यांच्याकडून याबाबत अधिकृत माहिती मिळाल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. ‘ब्लू फ्लॅग’ हे समुद्रकिनार्यांच्या स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सुरक्षितता, पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा आणि शाश्वत पर्यटनाच्या निकषांवर दिले जाणारे आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. डेन्मार्कस्थित फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन या संस्थेमार्फत ही प्रक्रिया राबविली जाते.
श्रीवर्धनला हे मानांकन मिळाल्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याची संधीही वाढणार आहे. या मानांकनाचे अधिकृत ‘ब्लू फ्लॅग’ मानचिन्ह लवकरच फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशनच्या माध्यमातून सुपूर्द केले जाणार आहे. हा बहुमान म्हणजे केवळ श्रीवर्धनच्या किनार्याचा गौरव नसून, रायगडच्या नैसर्गिक संपदेची, किनारपट्टीच्या स्वच्छतेची आणि पर्यावरणपूरक पर्यटनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली दखल आहे.
या यशासाठी सहकार्य करणारे अधिकारी, स्थानिक नागरिक, विविध यंत्रणांचे प्रतिनिधी आणि सहकारी यांचे अदिती तटकरे यांनी आभार मानले. या मानांकनामुळे रायगडच्या पर्यटन क्षेत्राला नवी झळाळी मिळण्यासोबतच स्थानिक रोजगार, पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, नागाव समुद्रकिनार्याला ऑक्टोबर २०२५ मध्ये पायलट दर्जा मिळाला होता. मात्र, अंतिम पुरस्काराच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट झालेले नाही.