पनवेल | कळंबोली येथे भरधाव टेम्पोने खासगी ट्रॅव्हल्स बसमधून उतरून सामान काढत असलेल्या दाम्पत्यासह बसच्या क्लिनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संगीता मोटे आणि बसचे क्लिनर बाळू सरताते यांचा मृत्यू झाला, तर संगीता यांचे पती पोपट मोटे गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर सुश्रुत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोपट मोटे (५०) हे कळंबोली सेक्टर-१ ई येथील एलआयजी वसाहतीत कुटुंबासह राहतात. काही दिवसांपूर्वी ते पत्नी संगीता यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील म्हसवड या मूळ गावी गेले होते. माणदेश ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने ते पुन्हा कळंबोली येथे परतत होते.
प्रवासादरम्यान कळंबोली सर्कल ओलांडल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणार्या मार्गावरील सीएनजी पंपाजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी मोटे दाम्पत्य आणि बसचे क्लिनर बाळू सरताते सामान काढण्यासाठी खाली उतरले होते. बस आणि फुटपाथ यांच्याम धील जागेत सामान काढत असताना कळंबोली सर्कलकडून मुंबईच्या दिशेने जाणार्या कोंबडी वाहतूक करणार्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
भरधाव टेम्पो थेट बस आणि फुटपाथमधील जागेत घुसल्याने तिघांना जोरदार धडक बसली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले.अपघातानंतर जखमींना तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी संगीता मोटे आणि बाळू सरताते यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी टेम्पो चालक याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.