दिवेआगर ग्रामस्थांना हुंदका अनावर...बुडून दगावलेल्या ‘त्या’ आठ निष्पाप विद्यार्थ्यांना अश्रूंची श्रद्धांजली

By Raigad Times    08-Oct-2026
Total Views |
 dighi
 
कापोली | आळंदी येथील विनर्स अ‍ॅकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा १ ऑक्टोबर रोजी दिवेआगर समुद्रकिनारी बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर हेलावून गेला. या निष्पाप विद्यार्थ्यांना दिवेआगर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित श्रद्धांजली सभेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
यावेळी उपस्थित ग्रामस्थ, महिला, शिक्षक, विद्यार्थी तसेच आजी- माजी लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दिवेआगरचा किनारा स्वच्छ व सुरक्षित किनारा म्हणून ओळखला जात असताना घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. "१ ऑक्टोबर हा दिवेआगरच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस ठरला.
 
मृत विद्यार्थ्यांच्या पालकांचे दुःख पाहून त्यांना धीर देतानाही शब्द अपुरे पडतात,” असे सांगताना सरपंच विजय तोडणकर भावूक झाले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता ग्रामपंचायत स्वतः पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. किनार्‍यावर चोवीस तास सुरक्षा रक्षक, स्वतंत्र रेस्क्यू टीम तसेच धोकादायक ठिकाणी सूचना व सतर्कता फलक उभारण्यात येणार आहेत.
 
दरम्यान, कोलाड येथील इंडियन रेस्क्यू अ‍ॅकॅडमीच्या पथकाने उपस्थितांना समुद्रातील बचावकार्याचे प्रात्यक्षिक दिले. आपत्कालीन परिस्थितीत लाईफ जॅकेटचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. या सभेला ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, महिला, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.