महाडजवळ महामार्गावर भीषण अपघात;चालकाचा जागीच मृत्यू, सहा जखमी

By Raigad Times    08-Oct-2026
Total Views |
mahad 
 
महाड | मुंबई-गोवा महामार्गावरील वहूर गावाच्या हद्दीत बुधवारी (७ ऑक्टोबर) सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव ईर्टिगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यालगत केबल टाकण्याचे काम करणार्‍या दोन कामगारांना जोरदार धडक दिली. आणि कार थेट शेतात जाऊन पलटी झाली.
 
या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला, कारमधील चार आणि दोन कामगार असे सहा जण जखमी झाले. बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबई-विरारच्या दिशेने जाणारी ईर्टिगा कार (क्र. एमएच ४८ एस ८८१०) वहूर गावाच्या हद्दीत आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कारने रस्त्यालगत स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीच्यावतीने केबल टाकण्याचे काम करणार्‍या कामगारांना धडक दिली.
 
त्यानंतर कार जाऊन शेतात पलटी झाली. या अपघातात चालक जमील शेख याचा जागीच मृत्यू झाला. कारमधील आरिफ रईस खान (४९, गोरेगाव, मुंबई), संतोष सुधाकर पाटील (३०, गोवा), मोहम्मद आसिफ मोहम्मद हुसेन चौधरी (३०, गोरेगाव, मुंबई) आणि मोहम्मद रफीक युसूफ झवेरी (५०, गोरेगाव, मुंबई) हे चार प्रवासी गंभीर जखमी झाले.
 
केबल टाकण्याचे काम करणारे सुनील मंगलसिंग पंधराम (२१, मध्य प्रदेश, सध्या रा. महाप्रळ) आणि खुन्नू बलहारी सेलू (३४, मध्य प्रदेश, सध्या रा. मंडणगड) हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.