अलिबाग | शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत रायगड जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील थकबाकी असलेल्या लाभार्थींसाठी महामंडळाने एकरकमी परतावा (ओटीएस) योजना लागू केली आहे.
या योजनेंतर्गत थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम एकरकमी भरून कर्ज खाते निकाली काढणार्या लाभार्थींना थकीत व्याजाच्या रकमेत तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. गेल्या काही काळापासून कर्जाची थकबाकी असलेल्या लाभार्थींना कर्जमुक्त होण्याची ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. ही एकरकमी परतावा योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
त्यामुळे रायगड जिल्ह्यातील महामंडळाच्या कर्जाची थकबाकी असलेल्या लाभार्थींनी विलंब न करता या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले थकीत कर्ज खाते निकाली काढून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे. या योजनेमुळे पात्र थकबाकीदार लाभार्थींनी निर्धारित मुदतीत एकरकमी कर्जफेड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.