श्रीवर्धनमध्ये व्हेल माशाची उलटी जप्त; तिघांना अटक

By Raigad Times    07-Oct-2026
Total Views |
shreewardhan
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन शहरातील जीवना पारनाका परिसरात विक्रीसाठी नेण्यात येत असलेली व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) पोलिसांनी जप्त केली. सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
पोलिसांना जीवना पारनाका परिसरात दोन तरुण दुचाकीवरून संशयास्पद पिशवी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना थांबवून पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली. चौकशीत ही उलटी विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे समोर आले.
 
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आणखी एका व्यक्तीचा शोध घेत तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचे वजन अंदाजे ६०० ग्रॅम असून, तिची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत सुमारे ६१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला ही उलटी सहा किलो वजनाची असल्याची चर्चा होती आणि तिची किंमत सुमारे सहा कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
 
मात्र प्रत्यक्ष तपासणीत तिचे वजन सुमारे ६०० ग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी विराज महेंद्र चौलकर (२५, रा. वरचा जीवना, श्रीवर्धन), ऋतुराज रामचंद्र रघुवीर (१९, रा. खालचा जीवना, श्रीवर्धन) आणि रामचंद्र जाया रघुवीर (४८, रा. खालचा जीवना, श्रीवर्धन) यांना अटक करण्यात आली आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
 
व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग महागड्या अत्तरांचा सुगंध टिकवून ठेवण्यासाठी केला जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी किंमत मिळते. मात्र भारतात तिची बाळगणूक व विक्री कायद्याने प्रतिबंधित आहे. तरीही आरोपी ती विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कारवाई केली. तिघांना श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली.
 
या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या उलटीचा स्रोत आणि संभाव्य खरेदीदार कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. "तपासात आणखी आरोपी निष्पन्न होतात का, याबाबत चौकशी सुरू आहे,” अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी दिली.