अलिबाग | अलिबाग-रेवस मार्गावरील नवगाव परिसरातील रामधरणेश्वर पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आशिका नितीन पवार (वय ३) आणि संजना संदीप पवार (वय ८) अशी मृत मुलींची नावे आहेत. दोघीही तलावापासून काही अंतरावर असलेल्या रामधरणेश्वर आदिवासी वाडीत राहत होत्या.
सोमवारी (५ ऑक्टोबर) घडलेल्या या घटनेमुळे वाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिका पवार, संजना पवार आणि माई राजू वाघमारे या तिघी रामधरणेश्वर आदिवासी वाडी परिसरात खेळत होत्या. खेळता खेळता त्या पाझर तलावाच्या परिसरात गेल्या.
यावेळी आशिका आणि संजना पाण्यात बुडाल्या. ही घटना लक्षात येताच माई वाघमारे हिने धावत वाडीत येऊन नागरिकांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाडीतील नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली आणि दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
अपघात विभागात दाखल केल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोघींनाही मृत घोषित केले. दोन चिमुकल्या मुलींच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे नवगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, याच रामधरणेश्वर पाझर तलावात काही महिन्यांपूर्वी पोहण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.