अलिबाग | रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या कटुतेची ठिणगी मनोजकुमार शिंदे यांच्यामुळेच पडली, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेतून केला आहे. पक्षाशी गद्दारी केल्यामुळेच शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले राजकीय स्थान पक्के करण्यासाठी आणि तटकरे कुटुंबीयांना खूश करण्यासाठी ते अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व शिवसेनेवर सातत्याने बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असा पलटवार केणी यांनी केला. यावेळी त्यांनी मनोज शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीतील विविध घटनांचा पाढाच वाचून दाखवला.
केणी यांनी शिंदे यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "ज्यांनी स्वतःच्या राजकीय आयुष्यात साधी ग्रामपंचायत निवडणूकही लढवली नाही, त्यांच्या नेतृत्वाची पत काय?” असा सवाल त्यांनी केला. शिंदे यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्यांनी काम केल्याचा आरोपही केणी यांनी केला. मात्र, जनतेने शिवसेनेच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करून शिंदे यांना त्यांची जागा दाखवून दिली, असा दावा त्यांनी केला.
रोहा एमआयडीसीतील कामगारांच्या प्रश्नावरही केणी यांनी शिंदे यांच्यावर आरोप केले. शिवसेनेच्या नावाखाली एमआयडीसीत हप्तेबाजी सुरू केल्याचा तसेच कंपनीतील वादाच्या वेळी कामगारांची साथ सोडून कंपनी व्यवस्थापनाशी आर्थिक तडजोड केल्याचा दावा त्यांनी केला. दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने वाहने आणल्याचे दाखवून पक्षाकडून त्याचे पैसे घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रोहा नगरपालिका निवडणुकीत आमदार महेंद्र दळवींनी पक्षासाठी मोठा निधी दिला असतानाही शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अंतर्गत समझोता केल्याचा आरोप केणी यांनी केला. उमेदवारीबाबत विरोधकांच्या मर्जीनुसार निर्णय घेत शिवसेनेची फसवणूक केल्याचा दावाही त्यांनी केला. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मदत करण्यासाठी आमदार महेंद्र दळवींनी पुढाकार घेतला होता.
मात्र, त्यावेळी शिंदे यांनी तटकरेंना मदत करू नये, अशी भूमिका घेत दळवींचे कान भरल्याचा दावा केणी यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतरही तटकरे कुटुंबीयांविरोधात तक्रारी करून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. "महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, शिवसेना आणि आमच्या आमदारांवर विनाकारण आरोप केले तर त्यांनी खुशाल अलिबागमध्ये यावे; त्यांचे शिवसेना स्टाईलने स्वागत केले जाईल,” असा इशाराही केणी यांनी दिला.
महायुतीतील वादावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त कोअर कमिटीची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. अशा वादांमुळे तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची कुचंबणा होत असल्याने वरिष्ठांनी पुढाकार घेऊन अंतर्गत कलह संपवावा, असे आवाहन केणी यांनी केले.