अलिबाग | महसूल विभागाशी संबंधित कामे करून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी (६ ऑक्टोबर) एसीबीने महसूलच्या पाच सरकारी कर्मचार्यांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई आणि रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलिबाग आणि उरण येथे दोन स्वतंत्र कारवाया केल्या.
एकाच दिवशी झालेल्या या कारवायांमुळे जिल्ह्याच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे. पहिली कारवाई अलिबाग तालुक्यातील थळ येथे करण्यात आली. तक्रारदाराने जमीन भोगवटादार वर्ग-२ वरून वर्ग-१ करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही प्रक्रिया करून देण्यासाठी तलाठी अमृत चौगुले याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार रायगड एसीबीकडे केली होती.
रायगड एसीबीच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने थळ येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. मंगळवारी (६ ऑक्टोबर) एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी अमृत चौगुले याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यासह कोतवाल बंड्या ऊर्फ जितेंद्र पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दुसरी कारवाई उरण तालुक्यातील चिरनेर येथे करण्यात आली. एका शेतकर्याने सातबारा उतार्यावर वारस नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. ही नोंद करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार शेतकर्याने नवी मुंबई एसीबीकडे केली. पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर चिरनेर येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेला असता, कोप्रोली मंडळ अधिकारी केशव मोहिते यांनी ती रक्कम कार्यालयातील मदतनीस मोनिका पाटील यांच्याकडे देण्यास सांगितली.
त्यानुसार तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारून केशव मोहिते यांच्याकडे देत असताना एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. लाच देण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून चिरनेरचे तलाठी जयहिंद कोळी यांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. जिल्ह्यातील या कारवायांमुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.