बुडून मृत्यू पावलेल्या त्या आठ विद्यार्थ्यांच्या...कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत!

पालकमंत्री भरत गोगावले यांची माहिती;मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निर्णय

By Raigad Times    07-Oct-2026
Total Views |
mahad
 
महाड | पुणे, आळंदी येथून दिवेआगर समुद्रकिनारी फिरायला आलेल्या आठ मुलांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली.
 
१ ऑक्टोबर रोजी पुणे, आळंदी येथील एका खाजगी कोचिंग क्लासचे विद्यार्थी, शिक्षकांसह ४८ जणांचा ग्रुप रायगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. किल्ला पाहून झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी गेले. यावेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्यात बुडाले.
 
या घटनेने विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. घटनेबाबत रायगडचे पालकमंत्री मंत्री भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
शासनाने यापूर्वी आषाढी-कार्तिकी वारीदरम्यान पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांचा अशा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दिवेआगर येथे घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी शासनस्तरावर आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच रायगडमध्ये पर्यटनासाठी येणार्‍या नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.