पेणमधील भुंडा पुलाच्या कामाचे राज्यस्तरावर कौतुक

By Raigad Times    06-Oct-2026
Total Views |
pen
 
पेण | पेणच्या सामाजिक आणि व्यापारी इतिहासाशी जोडलेल्या ब्रिटिशकालीन ‘भुंडा पुला’च्या जागी तरणखोप-पेण मार्गावरील भोगावती नदीवर उभारण्यात आलेल्या सुमारे १०० मीटर लांबीच्या आधुनिक पुलाच्या कामाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
 
हा पूल दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण केल्याबद्दल मे. श्री रामेेशर कन्स्ट्रशन, पेणचे मालक राजूशेठ पिचीका यांना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘उत्कृष्ट पूल पुरस्कार २०२५-२६’ प्रदान करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या ‘अभियंता गौरव समारंभा’त हा सन्मान देण्यात आला.
 
माजी खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रविंद्र पाटील यांच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. पुलासोबत बंधार्‍याचेही काम करण्यात आले असून, अतिवृष्टीतील नदीच्या पाण्याचा विचार करून संरचनेचे नियोजन करण्यात आले. जुना भुंडा पूल पेणच्या व्यापारी आणि सामाजिक जडणघडणीचा साक्षीदार होता. वाढती वाहतूक आणि सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन त्याच ठिकाणी आधुनिक पूल उभारण्यात आला असून, या दर्जेदार कामाला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार पेणच्या पायाभूत विकासासाठी महत्त्वाचा ठरला आहे.