सुट्टीनंतर माणगावात वाहतूक कोंडी ; पादचार्‍यांना झुडपांतून वाट; मुंबई दिशेने सात किमीपर्यंत रांग

By Raigad Times    06-Oct-2026
Total Views |
mangoan news
 
माणगाव | माणगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या रविवारी, ४ ऑटोबर रोजी पुन्हा गंभीर झाली. मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर माणगाव शहरापासून ढालघर फाट्यापर्यंत सुमारे सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक संथ झाली. रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने पादचार्‍यांनाही मार्ग काढताना मोठ्या
 
अडचणींचा सामना करावा लागला. माणगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक कोंडीची तीव्रता अधिक होती. एकाच लेनमध्ये वाहनांच्या रांगा लागल्याने काही ठिकाणी वाहने अत्यंत संथगतीने पुढे सरकत होती. दुचाकी, तीनचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांमुळेही रस्त्यावरील गर्दीत वाढ झाली. अनेक ठिकाणी पादचार्‍यांसाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांतून मार्ग काढावा लागला.
 
रविवारचा दिवस, सलग सुट्ट्यांनंतर सुरू झालेला परतीचा प्रवास आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे माणगाव परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण आला. मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेली कामे आणि अरुंद झालेल्या मार्गामुळे कोंडीत आणखी भर पडल्याचे चित्र होते. दरम्यान, माणगाव परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याने गर्दीच्या दिवसांसाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती, वाहनांचे प्रभावी नियमन आणि पादचार्‍यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सात किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगा आणि पादचार्‍यांना झुडपांतून वाट काढावी लागलेली परिस्थिती यामुळे माणगावच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.