माणगाव | संसदेच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूविषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. समितीत लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १०, असे एकूण ३१ सदस्य असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत पेट्रोलियम व नैसर्गिक वायू क्षेत्राला मोठे महत्त्व आहे.
इंधनाची उपलब्धता, कच्च्या तेलाची आयात, नैसर्गिक वायूचा वापर, तेल व गॅस कंपन्यांचे कामकाज, ऊर्जा सुरक्षेशी संबंधित धोरणे आणि ग्राहकांवर होणारा परिणाम यांसारख्या अनेक विषयांशी या समितीचे काम थेट जोडलेले आहे. त्यामुळे या समितीचे अध्यक्षपद हे केंद्राच्या ऊर्जा धोरणांवर संसदीय देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.
तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राशी संबंधित प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. विशेषतः औद्योगिक विकास, इंधन उपलब्धता, ऊर्जा पायाभूत सुविधा आणि कोकणातील पेट्रोलियम-रसायन उद्योगाशी संबंधित विषयांना राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने या जबाबदारीकडे पाहिले जात आहे.