कर्जत | उल्हास नदीतील गाळाची तपासणी करा , उल्हास नदी बचाव समितीची मागणी

नदीचे पाणी गढूळ, लालसर झाल्याने चिंता

By Raigad Times    06-Oct-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | सप्टेंबरच्या अखेरीस मोठा पाऊस झालेला नसतानाही उल्हास नदीचे पाणी गढूळ आणि लालसर झाल्याने उल्हास नदी बचाव कृती समितीने नदी परिसराची पाहणी करून गाळाच्या स्रोताचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
 
नदीतील पाण्याचा रंग बदलण्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पाण्याचे नमुने तसेच नदीतील गाळ, नदीकाठची माती आणि उत्खननातून बाहेर आलेल्या मातीची वैज्ञानिक तपासणी करावी, अशी मागणी समितीने केली आहे. उल्हास नदीच्या उगमस्थानापासून कोंढाणे लेणी परिसर, पेज नदीकाठ, टॉरंट पॉवर प्लांट परिसर, सावरगाव रेल्वे यार्ड तसेच वावे, वांजळे, बेंडसे, दहीवली, आवळस, नेवाळी, कोल्हारे, धामोते, शेलू, बांधिवली आणि खारवडी परिसराची समितीने पाहणी केली.
 
यावेळी चिल्हार, पेज आणि उल्हास नदीतील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तुलनात्मक तपासणी करण्याची आवश्यकता समितीने व्यक्त केली. पाहणीदरम्यान डोंगरकटिंग, वृक्षतोड, मातीचे विस्थापन, नदीकाठावरील बांधकामे आणि नदीत वाहून येणारा गाळ आढळून आल्याचे समितीने सांगितले. विशेषतः कर्जतजवळील पिंपळोळी परिसरातील चिल्हार नदीकाठावरील सुमारे १८० एकर क्षेत्रातील प्लॉटिंग प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगरकटिंग व वृक्षतोड झाल्याचे पाहणीत निदर्शनास आल्याचा दावा समितीने केला आहे.
 
डोंगराचा नैसर्गिक उतार बदलल्याने काही ठिकाणी माती घसरण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, ही लालसर माती पावसाच्या पाण्यासोबत चिल्हार नदीत आणि पुढे उल्हास नदीत वाहून येते का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चिल्हार नदीतील पाण्यासोबत नदीतील दगड आणि खडकांवरही लालसर थर आढळल्याचे समितीने म्हटले आहे.
 
त्यामुळे हा नैसर्गिक गाळाचा परिणाम आहे की अन्य कारणामुळे पाण्याचा रंग बदलला आहे, हे वैज्ञानिक तपासणीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे. तसेच परिसरातील बांधकामांमधून माती किंवा गाळ नदीत मिसळत आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. उल्हास नदी बचाव कृती समितीच्या वतीने ही पाहणी दिलीप कपोते फाउंडेशनच्या डॉ. कल्पना (राणी) कपोते यांच्या पुढाकाराने आणि शशिकांत दायमा यांच्या सहकार्याने करण्यात आली.
 
यावेळी रविंद्र लिंगायत, अशफाक शेख, प्रशांत राऊत, हरेश सोनावळे, मोहन भागवत, सचिन तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल, वन, जलसंपदा विभाग, स्थानिक प्रशासन तसेच संबंधित प्रकल्प आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त पाहणी करून डोंगरकटिंग, वृक्षतोड, नदीकाठावरील बांधकामे आणि माती व्यवस्थापनासंदर्भातील परवानग्यांची तपासणी करावी, अशी मागणी समितीने केली आहे. वैज्ञानिक जलनमुना तपासणी आणि गाळाच्या परीक्षणातूनच उल्हास नदीच्या पाण्याच्या लालसरपणाचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी भूमिका समितीने मांडली आहे.