पावसाच्या कागदी आकडेवारीमुळे म्हसळा येथील शेतकरी अडचणीत

पिके सुकली...भात, नाचणी आणि वरी पिकांचे मोठे नुकसान ; तातडीने पंचनामे करण्याची शेतकर्‍यांची मागणी

By Raigad Times    06-Oct-2026
Total Views |
 mhasala
 
म्हसळा | म्हसळा तालुक्यात दरवर्षी सरासरी चार ते साडेचार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
 
सप्टेंबरअखेरपर्यंत म्हसळा तहसील कार्यालयात ३ हजार ६९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी पाऊस वेळेवर न झाल्याने भात, नाचणी, वरीसह इतर तृणधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात जूनअखेरीस पावसाचे आगमन झाले; मात्र पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाच्या ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारली. त्यामुळे अनेक भागांतील शेतजमिनी कोरड्या पडून भेगाळल्या.
 
काही गावांमध्ये एकाच वेळी अतिवृष्टी झाली, तर काही भागांत गरजेच्या वेळी पाऊसच झाला नाही. पावसाच्या या असमान वितरणाचा परिणाम पिकांच्या फुटवे फुटण्याच्या, वाढीच्या आणि दाणे भरण्याच्या टप्प्यावर झाला. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत म्हसळ्याचा समावेश नाही. एकूण पावसाची आकडेवारी समाधानकारक दिसत असली, तरी प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे केवळ पावसाच्या मिलिमीटरमधील आकडेवारीचा आधार न घेता महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे शेतांवर जाऊन वस्तुनिष्ठ पाहणी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.