टकमक टोकावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

By Raigad Times    05-Oct-2026
Total Views |
 Raigad Fort Suicide | किल्ले रायगडावर घडले आक्रीत; टकमक टोकावरून उडी घेत तरुणाची  आत्महत्या
 
महाड | किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून एका ३७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. सुयोग सुरेश पांचाळ असे मृत तरुणाचे नाव असून, ते मूळचे खेड तालुक्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रेस्क्यू टीमने शोधमोहीम सुरू केली.
 
रविवारी (४ ऑक्टोबर) सकाळी दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. सुयोग पांचाळ हे सध्या ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहत होते. ३ ऑक्टोबर रोजी ते ठाणे येथून रायगडकडे निघाले. पहाटे किल्ल्याच्या पायथ्याशी कार पार्क करून ते पायरी मार्गाने गडावर गेले.
 
सकाळी साडेसातच्या सुमारास ते टकमक टोक परिसरात पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी पत्नीला व्हॉट्सअ‍ॅपवर जीवन संपविण्याबाबत सूचक संदेश पाठविल्याचे समजते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या भावाने किल्ले रायगड परिसरात त्यांचा शोध सुरू केला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने रेस्क्यू टीम आणि आपदा मित्रांच्या मदतीने शनिवारी दुपारनंतर गड परिसरात शोधमोहीम हाती घेतली.
 
किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचे वाहन आढळून आले. मात्र, रात्री अंधार झाल्याने शोधकार्य थांबवून रविवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. ड्रोनच्या सहाय्याने परिसराची पाहणी केली असता दरीत संशयित मृतदेह आढळून आला. त्यानंतर रेस्क्यू टीम, आपदा मित्र आणि पोलिसांनी अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत प्रयत्न करत दरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
 
या शोध व बचावकार्यात रेस्क्यू टीम कोलाडचे सागर दहीआंबेकर,अ‍ॅडव्हेंचर सोल महाडचे विशाल खांबे, शिलेदार अ‍ॅडव्हेंचर सोल कोल्हापूरचे सागर नलावडे तसेच आपदा मित्र महाडचे टीम लीडर अमिताभ जाधव यांच्यासह अन्य सदस्य सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक अभिजीत नेवसे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शोध व बचावकार्याचे मार्गदर्शन केले.