गरीबाघरी पहिल्यांदाच दिवा पेटला,आदिवासीबांधव आनंदाने नाचला!

८० वर्षांनंतर अलिबाग तालुक्यातील कर्डूस खुटेगाव आदिवासी वाडीपर्यंत पोहचली वीज..

By Raigad Times    05-Oct-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटूनही वीजेपासून वंचित असलेल्या अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील डोंगरमाथ्यावर वसलेल्या खुटेगाव या आदिवासी वाडीपर्यंत अखेर वीज पोहोचली आहे. अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या या वाडीतील घरांमध्ये पहिल्यांदाच विजेचा दिवा पेटल्याने ग्रामस्थांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला आहे.
 
वाडीत वीज आल्यामुळे या आदिवासी बांधवांनी नाचून आनंद व्यक्त केला.स्वातंत्र्यानंतरची अनेक दशके उलटली, पिढ्या बदलल्या; मात्र खुटेगावच्या वाट्याला उजेड आला नव्हता. सूर्य मावळल्यानंतर संपूर्ण वाडी अंधाराच्या कवेत जात होती. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अडचणी, महिलांना घरकामासाठी त्रास आणि ज्येष्ठांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते.
 
वीज ही इतरांसाठी रोजच्या जीवनाचा सामान्य भाग असताना खुटेगाव आदीवासीवाडीतील रहिवाशांसाठी ते एक स्वप्नच बनून राहिली होती. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून खुटेगावपर्यंत वीज पोहोचली. घरोघरी मीटर बसविण्यात आले आणि वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या घरांमध्ये पहिल्यांदा विजेचा प्रकाश पसरला. घरातील दिवा पेटल्याचे दृश्य पाहताना अनेक आदिवासी कुटुंबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
 
ALIBAG
 
आयुष्यभर ज्या उजेडाची प्रतीक्षा केली, तो आपल्या घरात पाहण्याचा क्षण अनेकांसाठी अविस्मरणीय ठरला. वाडीत वीज आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अबालवृद्धांसह संपूर्ण वाडी एकत्र आली. नाचत-गाजत, गाणी म्हणत आणि एकमेकांना शुभेच्छा देत ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. हा केवळ वीजजोडणीचा कार्यक्रम नव्हता, तर ८० वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा क्षण होता.
 
याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी भावूक झाले. अलिबाग तालुक्यातील एकही आदिवासी वाडी विजेविना अंधारात राहता कामा नये, हा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. वीज पोहोचल्याने येथील मुलांच्या शिक्षणाला, कुटुंबांच्या दैनंदिन जीवनाला नवी दिशा मिळणार आहे. पेटलेला हा पहिला विजेचा दिवा केवळ एका वाडीचा अंधार दूर करणारा ठरला नसून, अनेक दशकांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी कुटुंबांसाठी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.