अलिबाग | दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर अलिबाग नगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे. नगरपालिकेचे बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी अलिबाग समुद्रकिनार्यावरील जीवरक्षक यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी जीवरक्षकांकडे उपलब्ध साधनसामग्रीचीही पाहणी करण्यात आली.
देशाच्या विविध भागांतून अलिबागला येणार्या अनेक पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसतो. त्यामुळे उत्साहाच्या भरात काही पर्यटक खोल पाण्यात जाण्याचा धोका पत्करतात. अशा वेळी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जीवरक्षकांकडून समुद्रात उतरणार्या पर्यटकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास सायरनद्वारे पर्यटकांना वेळीच सावध केले जाते.
समुद्रकिनार्यावर दुर्घटना टाळण्यासाठी अलिबाग नगरपालिकेने २००९ पासूनच जीवरक्षक तैनात केले आहेत. सद्यस्थितीत अलिबाग समुद्रकिनार्यावर चार पुरुष आणि एका महिला जीवरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी एक स्पीडबोट, स्ट्रेचर आणि जीवरक्षक जॅकेट्स उपलब्ध आहेत. समुद्रातील भरती-ओहोटी तसेच धोकादायक परिस्थितीबाबत पर्यटकांना सूचना देण्यासाठी सायरनची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
दिवेआगर दुर्घटनेनंतर समुद्रकिनार्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत नाईक यांनी किनार्याची पाहणी करून सुरक्षाव्यवस्थेचा फेरआढावा घेतला. समुद्रकिनार्यावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जीवरक्षकांनी अधिक सतर्क राहून पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे, शहर अभियंता मुंडे उपस्थित होते.