माणगाव | कोकणासह संपूर्ण रायगड जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी केली आहे. तसेच शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर मजुरांना २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोकणातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) रायगड जिल्ह्यात शेतकर्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकर्यांच्या व्यथा सरकारच्या दरबारी मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण, श्रीहर्ष कांबळे, तालुका अध्यक्ष सकपाळ, महाड शहर अध्यक्ष पराग वडके आदी पदाधिकारी उपस्थित होते . दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर मजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. तसेच बँका आणि सावकारांनी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना त्रास देऊ नये अशा काही मागण्या केल्या आहेत.
‘पालकमंत्र्यांनी जनतेच्या अपेक्षांप्रमाणे काम करावे’
रायगडला पालकमंत्रीपद मिळण्यात सुरुवातीपासूनच अन्याय झाल्याचे म्हटले. अनेक वर्षे रायगडला पालकमंत्री नव्हता. आता पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांनी जनतेच्या अपेक्षांप्रमाणे काम करावे, असे ते म्हणाले. सरकारने शेतकरी आणि जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे असून, सरकारला जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्ग...
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरही शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली. हा महामार्ग सर्वाधिक निकृष्ट दर्जाचे काम झालेल्या महामार्गांपैकी एक असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या महामार्गाच्या प्रश्नापुढे हात टेकल्याचे शिंदे म्हणाले.
ठेकेदारांची क्षमता न तपासता कामे दिल्यामुळे महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून, या कामात केवळ पैशांची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरूनही शिंदे यांनी सरकारवर टीका केली. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचा आरोप करत सरकार कायदासुव् यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.