रायगडात फिरायला आलेल्या मुलांचा मृत्यू , त्या आठ लेकरांचा अखेरचा प्रवास

रायगडकरांनाही रात्रभर झोप लागली नाही...

By Raigad Times    04-Oct-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | रायगडच्या ऐतिहासिक भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा पाहून ती कोवळी पावले दिवेआगरकडे फिरण्यासाठी निघाली. आनंदाचे हे क्षण आयुष्यातील शेवटचे ठरतील, याची कल्पनाही कुणी केली नव्हती.
 
सकाळपासूनचा उत्साह, मित्रांसोबतचे हास्य, मोबाईलमध्ये टिपलेले आनंदाचे क्षण आणि पालकांना केलेले आनंदाचे फोन... या सगळ्या आठवणी मागे ठेवून आळंदीच्या आठ कुटुंबांची लेकरे कायमची निघून गेली. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी घडली. आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे हे विद्यार्थी होते. अकॅडमीतील ४८ जणांचा समूह रायगडात पर्यटनासाठी आला होता. सुरुवातीला रायगड किल्ल्याला भेट देऊन त्यानंतर दिवेआगर समुद्रकिनारी जाण्याचा त्यांचा बेत होता.
 
१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता आळंदी येथून या विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू झाला. सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास ते रायगड किल्ल्यावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने भारावून गेलेल्या विद्यार्थ्यांनी किल्ल्यावरील विविध स्थळांना भेट दिली.
 
किल्ला पाहून झाल्यानंतर ते दिवेआगरच्या दिशेने रवाना झाले. एका विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४:३० च्या सुमारास सर्व विद्यार्थी दिवेआगर बीचवर पोहोचले. गणेशोत्सवानंतर पर्यटनाचा हा पहिलाच दिवस असल्याने किनार्‍यावर नेहमीपेक्षा कमी वर्दळ होती. समुद्राचे विशाल रूप पाहून १६ ते १७ वर्षांचे हे विद्यार्थी भारावून गेले. मुली किनार्‍यावर सुरक्षितपणे पाण्यात खेळत होत्या, तर पोहता येणारी मुले थोडी पुढे गेली होती.
 
मुलांनी जास्त आत जाऊ नये म्हणून शिक्षक स्वतः त्यांच्यापुढे पाण्यात उभे होते. मात्र, समुद्रात असलेल्या एका खड्ड्याचा आणि पाण्याच्या खोलीचा मुलांना अंदाज आला नाही. तितक्यात एक मोठी लाट आली आणि मुले पाण्यात उलटली. नाकातोंडात पाणी आणि वाळू गेल्यामुळे त्यांना सावरता आले नाही. एका मुलाने हात वर करुन ‘वाचवा, वाचवा’ असा आरडाओरड केल्यानंतर किनार्‍यावरील सर्वांच्या ही गोष्ट लक्षात आले शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ पाण्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले.
 
शिक्षक आणि पोहता येणार्‍या २-३ मुलांनी पाण्यात उड्या मारुन ३ ते ४ जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सुमारे १० मिनिटांनी पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी उर्वरित मुलांना बाहेर काढून माऊथटू-म ाऊथ ब्रीथिंग आणि सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. क्षणभरापूर्वी हास्याने भरलेला समुद्रकिनारा अचानक आरडाओरड, धावपळ आणि आक्रोशाने हादरुन गेला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र प्रयत्न करुनही आठ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
 
या दुर्घटनेने घटनास्थळी उपस्थित सहकारी विद्यार्थी आणि शिक्षक अक्षरशः हादरुन गेले. कोणाला काय करावे, काय बोलावे, हेच सुचत नव्हते. पोलिसांनी घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना दिली. काही वेळापूर्वीपर्यंत मित्रांसोबत हसणारी-खेळणारी ही मुले मोबाईलच्या कॅमेर्‍यात आनंदाचे क्षण साठवत होती. कुणी मित्रांसोबतचे फोटो टिपत होते, तर कुणी घरी फोन करून दिवसभराचा आनंद सांगत होते.
 
मात्र, काही वेळातच त्याच मोबाईलवर आलेल्या एका फोनने अनेक कुटुंबांचे जग उद्ध्वस्त केले. काही तासांपूर्वी आपले लेकरू आपल्याशी बोलत होते आणि आता ते या जगात नाही, ही कल्पनाच पालकांसाठी असह्य होती. या दुर्घटनेनंतर सोबतचे विद्यार्थी पूर्णपणे हादरून गेले. कुणाला काय बोलावे आणि कुणाला काय सांगावे, हेच सुचत नव्हते. दुर्घटनेची माहिती आळंदीतील कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच अनेक घरांमध्ये आक्रोश सुरू झाला. काही तासांपूर्वी डोळ्यांसमोर असलेले मुलांचे हसरे चेहरे पुन्हा पाहण्यासाठी पालकांनी श्रीवर्धनकडे धाव घेतली.
 
श्रीवर्धन येथील सरकारी रुग्णालयात आपल्या लेकरांचे मृतदेह पाहताच कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण हेलावून गेले. आई-वडिलांनी आपल्या मुलांना हाका मारल्या; मात्र उत्तर देण्यासाठी ती लेकरे तिथे नव्हती. समोर उभे राहिलेले ते दृश्य उपस्थित प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारे होते. ज्या हातांनी काही तासांपूर्वी मुलांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला होता, त्याच हातांनी आता आपल्या लेकरांच्या पार्थिवाला स्पर्श केला.
 
ज्या घरांमध्ये त्यांच्या परतीची वाट पाहिली जात होती, त्या घरांवर आता कायमची शोककळा पसरली आहे. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) या आठही विद्यार्थ्यांचे पार्थिव घेऊन त्यांचे कुटुंबीय आळंदीच्या दिशेने रवाना झाले. रायगड फिरण्यासाठी आलेली आळंदीची आठ लेकरे कायमची निघून गेली. या घटनेने केवळ आळंदीतील आठ कुटुंबेच नव्हे, तर संपूर्ण रायगडचेही काळीज पिळवटून निघाले. या हृदयद्रावक दुर्घटनेने रायगडकरांनाही रात्रभर झोप लागली नाही.