कर्जत । सह्याद्रीच्या कुशीतील समृद्ध वनसंपदेवर महायुती सरकारने कुर्हाड चालवली आहे. भ्रष्टाचाराच्या नादात गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकण्याचा प्रयत्न सुरू असून, महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा नष्ट करण्याचे सरकारचे प्रयत्न जनता कदापी सहन करणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
सरकारचे मनसुबे हाणून पाडू आणि वनसंपदेच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी कर्जत आणि भीमाशंकर परिसरातील जंगलात सुरू असलेल्या वृक्षतोडीची सपकाळ यांनी गुरुवारी (29 ऑक्टोबर) पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या दौर्यात प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ.मनीष पाटील, जिल्हाध्यक्ष राजा ठाकूर, महिला जिल्हाध्यक्ष अॅड.श्रुती म्हात्रे, रेखा घरत, युवक जिल्हाध्यक्ष निखिल ढवळे, उपाध्यक्ष दिनानाथ देशमुख, तालुकाध्यक्ष संजय गवळी, युवक प्रदेश सचिव सूरज पंडित, युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, संरक्षित वनक्षेत्रात बुलडोझर चालवण्याचे काम सुरू असून, टोरंट कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप त्यांनी केला.
ऊर्जा धोरणावरही सपकाळ यांनी टीका केली. राज्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना पर्यावरणीय हिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगत, सरकारच्या धोरणांमुळे सह्याद्रीतील जंगलांच नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “राज्याचे झाडे खाणारे मुख्यमंत्री झाडे तोडतात; आम्ही झाडे लावतो,” अशी टीका करत त्यांनी सरकारच्या पर्यावरणविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती लुटली जात असल्याचे सांगत, स्थानिक ग्रामस्थांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहील आणि वृक्षतोडीविरोधात वेळप्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंतप्रधान मोदींच्या आईच्या नावाने काँगे्रसचे वृक्षारोपण
पंतप्रधान यांनी ‘एक पेड माँ के नाम’ही संकल्पना या ठिकाणी आम्ही राबवली. मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंच्या नावाने जेथे झाड लावले आहे, ते झाड जगवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत उपसरपंच आणि वन हक्क समिती यांनी घेतली आहे.
झाडे कापून देश भकास करण्याचे काम सरकार करत असताना आम्ही शाश्वत विकास करण्यासाठी झाडे लावत आहोत आणि जगवणारदेखील आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
बक्षिस म्हणून हा प्रकल्प?
ुप्रीम कोर्ट आणि माधवराव गाडगीळ समितीचा ‘सह्याद्रीमध्ये प्रकल्प नको’ असा अहवाल असतानादेखील सह्याद्री पोखरला जात आहे. टोरंट कंपनीने कॅश रोखे भाजपला दिले आहेत, याचे बक्षिस म्हणून हा प्रकल्प दिला असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.