कर्जत | कर्जत सायडोंगर परिसरातील प्रस्तावित टोरंट प्रकल्पावरून रान उठलेले असतानाच, सह्याद्रीच्या परिसरात आणखी २३ प्रकल्प येत असल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यापैकी तीन प्रकल्प केंद्र सरकारचे असून उर्वरित २० खासगी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व प्रकल्पांचा इथल्या नैसर्गिक वातावरणावर एकत्रित परिणाम काय होणार, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.कर्जत येथे बुधवारी (दि.२८) आयोजित जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी वृक्षतोडीबरोबरच प्रकल्पाची पारदर्शकता, खासगी उद्योगांना दिले जाणारे प्राधान्य आणि महाराष्ट्राच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचे पर्यावरण उद्ध्वस्त होणार असेल, तर अशा विकासाची दिशा तपासण्याची गरज असल्याचे त्यांच्या भाषणातून अधोरेखित झाले.
‘जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखे वाटले’
सायडोंगर परिसरातील वृक्षतोडीचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले की, तेथील जंगलात गेल्यानंतर अनेक वर्षांची जुनी झाडे तोडून लाकडांचे ढीग रचून ठेवल्याचे दिसले. ते दृश्य पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखे वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
एखाद्या खासगी उद्योगाच्या फायद्यासाठी इतक्या वर्षांत वाढलेली झाडे तोडली जात असतील, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात उद्योगधंदे आले पाहिजेत आणि राज्याची प्रगती झाली पाहिजे, याला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी पर्यावरण यांचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली. मात्र, महाराष्ट्राच्या भवितव्याशी संबंधित निर्णय महाराष्ट्रातील जनतेने आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावेतअशी भूमिका त्यांनी मांडली.
एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी निर्णय घेताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले होते का, याबाबत राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकल्पावर ग्रामसभा, ग्रामपंचायत किंवा विधानसभेत चर्चा झाली होती का? झाली असल्यास त्यासंबंधीची माहिती मराठी भाषेत जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे का? असे सवाल त्यांनी केले. प्रकल्पाची नेकी गरज काय, त्याचे पर्यावरणावर कोणते परिणाम होणार आहेत आणि स्थानिक नागरिकांना त्यातून काय लाभ मिळणार आहेत, याची स्पष्ट माहिती समोर आली पाहिजे, अशी मागणी त्यांच्या भाषणातून पुढे आली.
मोठ्या प्रकल्पांबाबत निर्णय घेताना स्थानिक लोकांचा सहभाग आणि माहितीची पारदर्शकता महत्त्वाची असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पाच्या अनुषंगाने वीजेच्या वापराबाबतही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. पंप स्टोरेज प्रकल्पाच्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागते. त्यासाठी स्वतंत्र सौरऊर्जा व्यवस्था उभारण्यात आली आहे का, तसेच प्रकल्पातून निर्माण होणार्या वीजेचे वितरण कसे याचा खुलासा सरकारने करावा, असे ते म्हणाले. राज्यात वाढत असलेल्या डेटा सेंटरसारख्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात वीज आणि पाण्याची गरज भासणार आहे.
त्यामुळे सायडोंगर परिसरातील प्रकल्पाचा या व्यापक औद्योगिक गरजांशी काय संबंध आहे, म हाराष्ट्राला त्याचा प्रत्यक्ष किती फायदा होणार आहे आणि त्याचे लाभार्थी कोण असतील, हे जनतेसमोर स्पष्ट झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मोदी-शाह यांच्यावर निशाणा प्रकल्पाच्या निर्णयांवरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली.
म हाराष्ट्रातील महत्त्वाच्या निर्णयांध्ये राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना किती महत्त्व दिले जाते, असा सवाल करत त्यांनी केंद्रातील नेतृत्वाच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला. अमित शाह यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, "कुर्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही. ती ज्या दिवशी बसेल, त्या दिवशी तुम्ही केलेली पापं आठवतील.” महाराष्ट्रातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि महत्त्वाच्या जमिनींबाबत निर्णय घेताना राज्याच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे, असे सांगत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला देत त्यांनी मराठी माणसाने आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील निर्णयांबाबत नागरिकांनी निष्क्रिय राहू नये, असे ते म्हणाले. "महाराष्ट्र राहिला पाहिजे, तो मराठी माणसांचा राहिला पाहिजे,” अशी भूमिका म ांडत त्यांनी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या प्रगतीला आपला विरोध नसून, राज्याच्या हिताला बाधा आणणार्या निर्णयांना विरोध असल्याचेही स्पष्ट केले.