कर्जत | कर्जत तालुक्यातील पाली परिसरातील सायडोंगर भागात प्रस्तावित टोरंट वीज प्रकल्पावरून आता सत्ताधारी महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रकल्पासाठी होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या हे दोन नेते वेगवेगळे स्वर आळवताना दिसत आहेत.पाली तर्फे कोतवाल खलाटी येथील साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीचा वीज प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यावरून स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे.
प्रकल्पामुळे वीज उत्पादनात वाढ आणि रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी जंगलतोड, स्थानिकांचे प्रश्न आणि पर्यावरणाचे संरक्षण या मुद्द्यांवरून वाद चिघळला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी टोरंट प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात विजेची कमतरता भासू नये आणि वीज उत्पादन क्षमता वाढावी, यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. तसेच औद्योगिक विकासाच्या मर्यादित संधी असलेल्या कर्जत तालुक्यातील तरुणांसाठी रोजगारनिर्मितीची शक्यता निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, प्रकल्पासाठी जमीन जाणार्या शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न सोडविल्याशिवाय काम पुढे नेऊ नये, अशी भूमिकाही थोरवे यांनी मांडली.
बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्पाला पाठिंबा देतानाच स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा संदेश त्यांनी दिला आहे. वृक्षतोडीच्या मुद्द्यावरही थोरवे यांनी भूमिका मांडली. प्रकल्पासाठी झाडे तोडली जात असतील, तर त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट वृक्षलागवड करण्यात यावी. राज्य सरकारसोबतच टोरंट कंपनीनेही वृक्षलागवडीची जबाबदारी घ्यावी आणि वनविभागाने संवर्धन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीची प्रकल्पविरोधी भूमिका , प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांची गळचेपी!
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचा आरोप
खोपोली | आमदार थोरवे यांनी प्रकल्पाच्या बाजूने भूमिका घेतलेली असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीने प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीविरोधात थेट घटनास्थळी जाऊन भूमिका स्पष्ट केली. पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी सायडोंगर परिसरातील वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात वृक्षलागवड आणि संवर्धनाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी केला. प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केला. बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबवून पर्यावरणाचे संरक्षण करावे, अशी मागणीही घारे यांनी केली.
स्थानिक सरपंच संजना पवार यांनी प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे सांगितले. तसेच कंपनीचे प्रतिनिधी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याची तक्रार त्यांनी मांडली. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रक्रियेबाबत आणि स्थानिकांच्या सहभागाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा प्रवक्ते भरत भगत, पंचायत समिती सभापती नमिता घारे, कर्जत नगराध्यक्षा पुष्पा दगडे, कर्जत तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, खालापूर तालुकाध्यक्ष अंकित साखरे आणि महिला तालुकाध्यक्ष अॅड. रंजना धुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. टोरंट प्रकल्पामुळे राज्याच्या वीज उत्पादनात वाढ होण्याची आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळण्याची अपेक्षा सरकारला आहे.
मात्र, त्यासाठी होणारी वृक्षतोड, वनक्षेत्राचे संरक्षण आणि प्रकल्पबाधितांच्या मागण्यांवरून संघर्ष निर्माण झाला आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे प्रकल्पाच्या बाजूने उभे राहताना स्थानिकांचे प्रश्न सोडविण्याची अट मांडत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी दोन पक्षांच्या नेत्यांमध्येच मतभेद दिसून येत आहेत